Goa Dairy ला सहा कोटी रुपयांचे नुकसान; सभेत वादळी चर्चा

चौकशी करण्याची संचालक मंडळाची तयारी
Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गोवा डेअरी सध्या नफ्यात आहे, की तोट्यात, याबाबत दूध उत्पादकांत संभ्रम निर्माण झाला आहे. आजच्या पन्नासाव्या सर्वसाधारण सभेत दूध सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आवाज उठवून गोवा डेअरीची स्थिती पूर्वपदावर आणण्याची जोरदार मागणी केली.

या सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. सद्यःस्थितीत गोवा डेअरीला सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संचालक मंडळाने दिली.

Goa Dairy
Goa Petrol Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, गोव्यातील पेट्रोलच्या किमतीत बदल?

डेअरी पुन्हा नफ्यात आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अध्यक्ष राजेश फळदेसाई व इतर संचालकांनी दिली. गोवा डेअरीची आज सर्वसाधारण सभा कुर्टी येथील सहकार भवनमध्ये झाली. त्यावेळी संचालक मंडळासह गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक पराग नगर्सेकर तसेच सहकार खात्याचे पंकज मराठे उपस्थित होते.

या सभेत काही विषयांवरील प्रश्‍नोत्तरावेळी गदारोळ झाला, पण नंतर वातावरण निवळले. गोवा डेअरीचा लेखा अहवाल, सातत्याने होत असलेले नुकसान आणि दुधाचे घटते उत्पादन यावर राज्यातील विविध दूध डेअरींच्या अध्यक्षांनी आवाज उठवला. या सभेत संचालक मंडळाने उत्तरे देताना गोवा डेअरीच्या मागच्या सरकारनियुक्त प्रशासकांच्या कारकिर्दीतील कारभाराचा पंचनामा करण्याचे ठरवले.

गोवा डेअरीच्या मागच्या कारभाराची येत्या दोन महिन्यांत चौकशी करून त्यानंतर हा विषय पुढील सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येईल, असे गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

गोवा डेअरीच्या माजी कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक राधिका काळे यांच्यावरील चौकशी त्वरित पूर्ण करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासंबंधीही चर्चा झाली. दुधाचा पुरवठा, पशुखाद्य व इतर विषयांवरही यावेळी बरीच चर्चा झाली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही सभा दुपारी तीनच्या सुमारास आटोपती घेण्यात आली.

पशुखाद्य प्रकल्प निविदेची चौकशी!

गोवा डेअरीच्या तत्कालीन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर व इतर संचालकांनी दूध उत्पादकांना दिलेल्या दर फरकाबाबत चौकशी करण्याबरोबरच पशुखाद्य प्रकल्पातील मोलॅसिस टाकीच्या व्हॉल्व स्फोटप्रकरणी जबाबदार सदोष निविदा प्रक्रिया तसेच इतर आरोपांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

डेअरी नुकसानीत असल्याने दूध उत्पादकांना दर फरक देणे योग्य नसल्याचा शेरा लेखा विभागाने मारला असतानाही हा दर फरक दिला आहे. त्यामुळेच या व्यवहाराचीही चौकशीची मागणी होत आहे, असे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी सांगितले.

15 दिवसांत ऑडिट : काळेबेरे असल्याचा संशय

गोवा डेअरीच्या व्यवहाराची चौकशी सरकारने करायला हवी. आमच्या कारकिर्दीत नफा झाला. त्यामुळेच दीड कोटी रुपये दरफरकाच्या रूपाने दूध उत्पादकांना देण्यात आले. एक ऑडिट करण्यासाठी किमान चार महिने लागतात, मात्र आता नवीन संचालक मंडळाने नेमलेल्या लेखापालाने केवळ पंधरा दिवसांत हे ऑडिट केल्याने निश्‍चितच यात नक्कीच काळेबेरे आहे.

मागच्या आमच्या काळातील ऑडिटचे बऱ्याच प्रमाणात ‘कॉपी पेस्ट'' करण्यात आले असल्याने या ऑडिटचा दर्जा काय आहे, ते सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तरीही सरकारनेच संपूर्ण डेअरी व्यवहाराची चौकशी करावी. आमच्या काळात दूध उत्पादकांना ऐन कोविड काळात दर फरक दिला, याचेच दुःख या संचालक मंडळाला झाले, हे निश्‍चित, असे प्रशासकीय समितीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर म्हणाले.

डेअरी निश्‍चितच लाभात येईल!

डेअरी यावेळेला निश्‍चितच फायद्यात येईल, यात शंका नाही. त्यादृष्टीने संचालक मंडळ काम करणार असून मागच्या दोन वर्षांच्या लेखा अहवालावर आम्ही तसेच सोसायटीचे अध्यक्ष समाधानी नव्हते. त्यावर यावेळेला या हिशेबासंबंधी लेखापालांनी काही हरकती नोंदवल्या आहेत. त्यावर योग्य चौकशी व्हावी, असे मत गोवा डेअरीचे संचालक माधव सहकारी यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com