Goa Land Grabbing Case : राज्यात गाजत असलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या एसआयटीने आपली मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी अटक केलेल्या मास्टरमाईंड रॉयसन रॉड्रिग्स याने आपल्या जबानीत बार्देशचे मामलेदार आणि निबंधक आपल्याला मदत करत असल्याचा गौप्यस्फोट केल्याने बार्देशचे मामलेदार राहुल देसाई यांच्या विरोधात दोन गुन्हे नोंद केले आहेत.
तत्कालीन बार्देश निबंधकांचेही याप्रकरणी नाव आल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. लवकरच या दोघांना एसआयटीकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
(Goa Land Grabbing Case)
शुक्रवारी मास्टरमाईंड रॉयसन रॉड्रिग्स, राजकुमार संतोष मैथी, सॅड्रिक डॉम्निक फर्नांडिस या तिघांना अटक करून त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या जबानीमध्ये राज्यातील अनेक राजकीय नेते आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांनी त्याआधारे कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून बार्देशचे मामलेदार राहुल देसाई यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
जमीन हडप प्रकरणात बार्देशचे मामलेदार देसाई हे म्युटेशनसाठी मदत करत होते, अशी धक्कादायक जबानी रॉयसन रॉड्रिग्स याने दिल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एसआयटीने देसाई यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकरणामध्ये बार्देश निबंधकांचाही हात असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येत असल्याने लवकरच बार्देश मामलेदार आणि उपनिबंधकांना एसआयटीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राज्य पुरातत्व आणि अभिलेख कार्यालयाच्या दोघा कर्मचाऱ्यांना एसआयटीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. आता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे याप्रकरणी आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
निवडणुकीतही घोळ
काही दिवसांपूर्वी पंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी कळंगुट पंचायतीमधील प्रभाग 9 मध्ये जो उमेदवार व त्यांच्या चिन्हांचा घोळ घातला होता, त्याप्रकरणी तत्कालीन निर्वाचन अधिकारी राहुल देसाई हेही जबाबदार होते. त्यामुळे देसाई यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका निर्माण केली जात आहे.
सर्वंकष चौकशी सुरू
जमीन हडप केल्याची राज्यात सुमारे 150 प्रकरणे असून यापैकीच विविध पोलिस स्थानकांवर दाखल झालेली 28 आणि एसआयटीकडे आलेली 10 अशा 38 तक्रारींचा तपास सध्या सुरू असून महसूल, पुरातत्व, उपनिबंधक अशा अनेक बाजूंनी या प्रकरणांची सर्वंकष चौकशी सुरू आहे, अशी माहिती एसआयटीप्रमुख निधीन वॉल्सन यांनी माध्यमांना दिली.
15 जणांना अटक
जमीन हडप प्रकरणाची व्याप्ती राज्याबाहेरही पसरली असून यात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांसह कर्नाटकमधूनही काहीजणांना ताब्यात घेतले होते.
आता प्रशासनातील अधिकारीही या प्रकरणात सापडत असल्याने वेगळेच वळण मिळत आहे. आतापर्यंत या प्रकरणात 15 जणांना अटक झाली असून काहीजण जामिनावर आहेत.
या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड रॉयसन रॉड्रिग्स याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनेकांची नावे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातही काहीजणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
जमीन हडप प्रकरणात राजकारण्यांचा सहभाग असेल तर भाजप सरकारने त्याचा राजकीय फायद्यासाठी दबावतंत्र म्हणून वापर करू नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या दोषींवर ताबडतोब कारवाई करावी आणि या प्रकरणांचा एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करावा.
- युरी आलेमाव, कार्याध्यक्ष, काँग्रेस.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.