
कळंगुट: अपहरण आणि खंडणी प्रकरणी टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुणाल आणि पूजा यांच्यावर बंगाली चित्रपट निर्माते श्याम सुंदर दे यांचे गोव्यात अपहरण करुन खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.
निर्माते श्याम सुंदर दे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पश्चिम बंगालच्या पोलिसांकडे दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. श्याम सुंदर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ मे त ०४ जून दरम्यान ही घटना घडली.
श्याम सुंदर गोव्यात असताना त्यांची कार अडवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना हणजूण आणि साळगाव येथील हॉटेल व व्हिला येथे कोंडून ठेवण्यात आले. कुणाल आणि पूजाने त्यांच्याकडून २३ लाखांची खंडणी वसूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी कुणाल आणि पूजा यांच्यासमवेत आणखी काही लोक होते. त्यांनी श्याम सुंदर यांचा फोन देखील हिसकावून घेतला आणि मारहाण केली. पैसे पाठविण्यासाठी त्यांनी दुसऱ्या फोनची व्यवस्था केली होती, असे तक्रारीत पुढे म्हटले आहे.
श्याम सुंदर यांनी बाथरुममधून छुप्या पद्धतीने व्हिडिओ पाठवून पत्नीला या सर्व प्रकाराची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर ०४ जून रोजी त्यांची सुटका करण्यात आली.
कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी कलाकार कुणाल आणि पूजा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करुन, तपासास सुरुवात केली आहे. दोघांविरोधात अपहरण, खंडणी, गुन्हेगारी कट रचणे यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी संशयित पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी जवळच्या मित्राकडून आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती सोशल मिडियावरुन दिली होती. पण, घटना आणि पोस्ट यांच्या टायमिंगवरुन प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे श्याम सुंदर दे यांच्या पत्नीने देखील यानंतर फेसबुकवर एक पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या. जवळच्या मित्रांनी धोका देत विश्वासघात केला. हा प्रकार एक गंभीर गुन्हा आहे, तसेच त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देखील देण्यात आला. मला न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे, आम्ही कायदेशीर बाबीं पूर्ण करतोय, अशी पोस्ट श्याम सुंदर दे यांच्या पत्नीने लिहली आहे.
श्याम यांना खोट्या अमली पदार्थ प्रकरणाच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देऊन आणखी ६४ लाखांच्या खंडणीची मागणी संशयितांनी केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर कुणाल आणि पूजा यांनी देखील पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले आहे. आयुष्यातील सर्वात कठीण काळातून आम्ही जात आहे. आमच्या सोबत उभे राहिलेल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आमच्याविरोधात खोटं पसरवणाऱ्यासोबत असणाऱ्यांचे देखील देव भलं करो. माझा देवावर विश्वास आहे. देव सगळं पाहतोय.., असे प्रतिक्रिया पूजा बॅनर्जीने दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.