Goa Kala Academy: गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबत अखेर काल कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी हात झटकून ती आपल्या खात्याची जबाबदारी नव्हे, असे स्पष्ट केले.
कला अकादमीचे काम निविदा न काढताच झाले असले तरी ही संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्याने केली असून याबाबतचे प्रश्न त्यांनाच विचारा, असे सांगून आपण नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, या कामाबाबत भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स यांनीही शंका उपस्थित केली आहे. मात्र, आम्ही या सर्व कामाचे सुपरव्हिजन करत आहोत, असे साबांखा मंत्री काब्राल यांनी सांगितले.
याविषयी समाजकार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दक्षता आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे म्हणत दक्षता आयोगाने कामाच्या चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.
नोव्हेंबरअखेरीस होणार काम पूर्ण
कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. आता हे काम नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असे गावडे यांनी घोषित केली आहे. नूतनीकरणामुळे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कला अकादमीचे मुख्य कार्यालय बाहेरून काम करत आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी कलाकारांची मागणी आहे.
4 कोटींची इमारत, 56 कोटींचे काम
राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने टेकटॉन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 3 मे 2021 रोजी कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम 39.63 कोटी रुपयांना दिले असून यावर वेगवेगळे कर लावल्यानंतर हे काम 56 कोटी रुपयांच्या वर जाणार आहे.
विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड-
‘शहाजहान’ने केलेल्या कामाबाबत आता त्यांच्याच पक्षातून घरचा अहेर मिळत आहे. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची पार्टनरशीप आहे. ती कशात आहे, हे मी सध्या सांगणार नाही. मात्र, लवकरच तेही गुपित उघड करू. आता साबांखा मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.