100 Irrigation Dam to be Build In Goa Before Mansoon: राज्यातील धरणांमधील खालावणारी पाण्याची पातळी लक्षात घेऊन जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि जलस्त्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.
या बैठकीत ठरल्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी राज्यात 100 नवीन पाटबंधारे प्रकल्प उभारावेत तसेच सध्याच्या जलप्रकल्पांची दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये राज्यातील सर्वच धरणांतील पाण्याची पातळी खालावली आहे. जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतकेच पाणी धरण साठ्यांमध्ये आहे.
जर पाऊस वेळेत सुरू झाला नाही तर राज्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी जलस्त्रोत खात्याच्या वतीने मान्सून सुरू होण्यापूर्वी राज्यात शंभर छोटे पाटबंधारे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.
जलस्त्रोत खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,
राज्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाची
भूमिका बजावणाऱ्या साळावली धरणात गतसाली 2022 मध्ये एप्रिलच्या मध्यावर 54.95 टक्के पाणी होते. यंदा ते 41.73 टक्के इतके खाली आले आहे.
अंजुणे धरणामध्ये2022 मध्ये 37.51 टक्के पाणी होते ते 2023 म्हणजे आज रोजी केवळ 25.99 टक्के आहे. हीच स्थिती आमठाणे, पंचवाडी, चापोली आणि गावणे धरणांच्या बाबतीत आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
राज्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनची अपेक्षा असते. मात्र गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता पाऊस जूनच्या मध्यापर्यंत राज्यात दाखल होत नाही.
ही स्थिती यंदा आल्यास राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे लोकांनी पुढील काळात पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.