

पणजी: गोव्यातील जमीन बळकाव घोटाळ्यानंतर आता अमली पदार्थ व्यवहारातही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लक्ष घातले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेकजण गजाआड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिकोळणे येथे १५ एप्रिल रोजी गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल ४३.२० कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले होते. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरून अमली पदार्थ आणून वेफर आणि कॉफीच्या पाकिटांत दडवून स्थानिक पातळीवर विकण्याचा प्रयत्न चिकोळणे येथे सुरू होता.
याप्रकरणी सडा वास्को येथील मंगेश वाडेकर व रेश्मा वाडेकर या दांपत्यासह मूळ कोलकाता येथील पण बायणा येथे वास्तव्यास असलेल्या निबू व्हिसेंट याला पकडले होते. ईडीने या प्रकरणाचा समांतर तपास आरंभला होता. हे अमली पदार्थ लाओस येथून आणल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्यांनी देशांतर्गत वितरणासाठी असलेल्या यंत्रणेवर काम करणे सुरू केले.
ईडीच्या तपासात हेही स्पष्ट झाले की, या आरोपींचे संबंध दक्षिण-पूर्व आशियातील ‘गोल्डन ट्रँगल’ क्षेत्रासह मध्यपूर्व, नेपाळ आणि बांगलादेश येथे कार्यरत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी जाळ्याशी आहेत. या प्रकरणात आणखी संबंधित लाभार्थी आणि साहाय्यकांचा शोध सुरू असून, अमली पदार्थ व्यवहारांचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरूच राहील. "नशा मुक्त भारत" अभियानाच्या उद्दिष्टानुसार अशा गुन्ह्यांतून मिळालेल्या मालमत्तेचा मागोवा घेऊन ती जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, काळा पैसा प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत मंगेश वाडेकर, रेश्मा वाडेकर, निबू व्हिंसेंट यांच्यासह तांझानियन नागरिक वेदास्तो ऑडाक्स, झिंबाब्वेचा नागरिक तारीरो ब्राईटमोर मांग्वाना, मासूम उईके, चिराग दुधाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल करण्यात आली असून, लाओस येथून भारतात आणलेल्या सुमारे ४.३ किलो कोकेन तस्करीच्या प्रकरणाशी ती संबंधित आहे. या प्रकरणाची मूळ नोंद गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली होती.
ईडीने रेशमा वाडेकर हिच्याविरुद्धही कारवाई करताना १८ ऑक्टोबर रोजी तिच्या पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा येथे असलेल्या घरासह ४५ लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली. रेशमाने मार्च २०२५ मध्ये लाओसच्या व्हिएनतियान शहरातून भारतात ४.३ किलो कोकेन आणले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. आर्थिक तपासात आतापर्यंत सुमारे ८८ लाख रुपयांचा काळा पैसा अमली पदार्थ तस्करीशी संबंधित असल्याचे आढळले आहे. या रकमांचे व्यवहार खोट्या कंपन्या व बनावट खात्यांमधून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
अवैध निधी व्यवहारात तारीरोची मुख्य भूमिका: ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तपासादरम्यान १९ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, हरियाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एकाच वेळी कारवाई करण्यात आली. या दरम्यान महत्त्वाचे डिजिटल पुरावे, दोष दर्शवणारी कागदपत्रे तसेच अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या तपासादरम्यान तारीरो ब्राइटमोर मांग्वाना याला २२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तो आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यापार आणि अवैध निधी व्यवहारामध्ये प्रमुख भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.