

पणजी: गोवा हे जगभरातील सिनेरसिकांचे आकर्षण केंद्र बनत चालले आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. रेड कार्पेटच्या झगमगाटात दरवर्षी होत असलेला गर्दीचा गोंधळ यंदा मात्र इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
यावर्षी आयनॉक्सच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच थेट उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. विनायक डेकोरेटर्स या कंत्राटदार कंपनीने जुने गोमेकॉ ते आयनॉक्स या मार्गावर लोखंडी कमानीसह सजावटीचा अप्रतिम उड्डाणपूल उभारला आहे. त्या खालून प्रतिनिधी, छायाचित्रकार, पत्रकार आणि सामान्य नागरिकांना सहज ये-जा करता येईल. त्यामुळे रेड कार्पेटवरून चालणाऱ्या कलाकारांचा ग्लॅमरस प्रवास अखंडित राहणार आहे.
दरवर्षी या परिसरात गर्दीमुळे कलाकार आणि छायाचित्रकारांमध्ये होणाऱ्या चकमकी, अडथळे, वाद हे आता भूतकाळात जमा होणार आहेत. यंदा सर्व काही नियोजनबद्ध पद्धतीने आणि आकर्षक सजावटीसह साकारत आहे. सजावटीचे काम महिनाभर आधीच सुरू झाले असून, आयनॉक्स परिसरात भव्य आर्च, लाईटिंग स्ट्रक्चर्स आणि थीम बेस्ड डिझाईन्स तयार केली जात आहेत. दरवर्षीप्रमाणे परराज्यातील कुशल कारागीर आणि कलाकुसरीत निपुण कामगारांना गोव्यात आमंत्रित करण्यात आले आहे.
‘इफ्फी’ आता अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मनोरंजन सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) कार्यालयात तात्पुरते कर्मचारी कार्यरत झाल्याने हालचालींना वेग आला आहे. जुन्या गोमेकॉ इमारतीची स्वच्छता, रंगरंगोटी व लाकडी वस्तूंची निर्मिती यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण पसरले आहे. गोव्याची राजधानी आता ‘फिल्म फेस्टिव्हल सिटी’मध्ये रूपांतरित होत आहे. दिवसभर चालणारी लगबग, लावण्यात येणारे होर्डिंग्ज आणि हॉटेल परिसरात दिसणारी फिल्मी धांदल यामुळे इफ्फीचा माहोल सर्वत्र जाणवू लागला आहे.
आयनॉक्ससमोर लोखंडी कमानीसह उड्डाणपूल सज्ज. परराज्यातील कुशल कारागीरांचा सहभाग.
आयनॉक्स परिसरात लाकडी डेकोर आणि लाईटिंगचे काम सुरू. गोमेकॉ परिसरात रंगरंगोटी व स्वच्छतेला वेग.
रेड कार्पेटखाली उड्डाणपूल, गोंधळमुक्त प्रवेश
प्रतिनिधी, छायाचित्रकारांसाठी स्वतंत्र मार्ग
कलाकारांचा प्रवास अखंडित व आकर्षक
इफ्फीपूर्व तयारीत ईएसजीमध्ये हालचाली वाढल्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.