
पणजी: गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडी) सांकवाळ येथील येथील २ लाख चौरस मीटर औद्योगिक जमीन संरक्षण क्षेत्रातील गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीला (जीएसएल) सुमारे ८१.५ कोटी रुपयांना देण्यास मंजुरी दिली आहे. ही जमीन ४,००० रुपये प्रति चौरस मीटर या सवलतीच्या दराने विकली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
विशेष बाब म्हणजे जीआयडीसीने लिलावात या जमिनीची मूळ दर प्रति चौरस मीटरसाठी ५ हजार ७०० रुपये ठवरला होता, पण आता ४ हजार रुपये प्रति चौ. मी. जमीन सरकारने जीएसएलला देण्याचे ठरविल्याने सरकारी तिजोरीला सुमारे ३४.६ कोटी रुपयांचा महसूल तोटा होणार आहे.
जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या ३९८ व्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे, पण आम्ही या वाटपासाठी अटी घातल्या आहेत. स्थानिकांसाठी ५० टक्के रोजगार, एमएसएमईद्वारे खरेदी आणि सीएसआरअंतर्गत कौशल्य विकास संस्था स्थापन करणे, अशा अटी त्यात आहेत. गोव्यातील नोकऱ्यांबाबत आम्हाला वाईट अनुभव आले आहेत म्हणून या अटी घालणे आवश्यक आहे.
जीआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जीएसएलचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, महामंडळाने राष्ट्रीय हितासाठी थेट वाटपासाठी विशिष्ट मान्यता दिली आहे.
हा निर्णय अनेक विचारविनिमयानंतर घेण्यात आला. जुलै २०२४ मध्ये, जीआयडीसी बोर्डाने स्थानिक रोजगार, कौशल्य विकास आणि एमएसएमई खरेदीच्या वचनबद्धतेच्या अधीन राहून वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ८० हजार चौ. मी. जागा जीएसएलला देण्यास तत्वतः मान्यता दिली होती, पण जीएसएलने नंतर सांकवाळ येथे जमीन मागितली होती, असे जीआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.