Goa Illegal Sand Mining: पोलीस आले-गेले, 'खेळ' सुरुच! म्हादई पात्रातून छुप्या मार्गाने रेती वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त
वाळपई: राज्यात बेकायदा रेती उत्खननावर बंदी असतानाही सत्तरीतील सोनाळ, तार-सावर्डे, कुडशे आणि आसपासच्या भागात म्हादई नदीच्या पात्रात निर्भयपणे आणि खुलेआम उत्खनन सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी काही दिवसांनी रेती उत्खननाचे प्रकार पुन्हा सुरूच आहेत. त्यामुळे म्हादईच्या संरक्षणाबाबत प्रशासन खरोखरच गंभीर आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सावर्डे येथे गेल्या वर्षी रेती उत्खननादरम्यान होडी उलटून एका महिलेचा (Women) मृत्यू झाला होता. तसेच पोरस्कडे-पेडणे, कुडचडे येथेही या व्यवसायातून बळी गेलेले आहेत. या घटनेनंतर कडक कारवाईची अपेक्षा होती; मात्र उत्खननावर नियंत्रण येणे दूरच राहिले, हा बेकायदा व्यवसाय पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे.
म्हादई नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने घटत असून नदीकाठची जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. सततच्या खोदकामांमुळे नदीचे नैसर्गिक पात्र उद्ध्वस्त होत आहे. किनारी मातीची धरपकड कमी होऊन माशांच्या प्रजातींसह जलसजीवांवर संकट निर्माण झाले आहे. पावसाळ्यात अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे की, वारंवार येणारे पूर हे मोठ्या प्रमाणातील अवैध उत्खननाचेच फलित आहे. प्रतिनिधींनी आज परिसराची पाहणी केली असता काही जण नदीच्या पात्रात उतरून रेती काढताना दिसले. पत्रकारांना पाहताच त्यांनी पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, रेती छुप्या मार्गाने ट्रकद्वारे वाहून नेली जाते. नदीपात्रातील रेती गोळा करण्यासाठी कामगारांचा वापर केला जातो. पोलिस, भरारी पथके येतात-जातात, पण ‘खेळ’ मात्र सुरूच असतो, अशी संतप्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी वाळपई (Valpoi) पोलिसांनी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कारवाई केली होती. तरीही उत्खनन सुरूच आहे. नदीपात्रातील खोदकाम अनेकदा लहान होड्यांमधून, जीव धोक्यात घालून केले जाते.
म्हादई नदीचे अस्तित्वच धोक्यात
वाळूचे प्रमाण कमी झाल्यास पाण्याचा प्रवाह विस्कळीत होतो. त्यामुळे खोल झालेले नदीचे खोरे पावसाळ्यात मोठ्या पुराचा धोका वाढवते. किनारी शेती, गावे आणि जनजीवनावर दीर्घकालीन परिणाम होतो. जैवविविधता नष्ट होऊन पाण्याची पातळी सतत कमी होत आहे. त्यामुळे या नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
कठोर कारवाईची वारंवार मागणी
नियमित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. नदीपात्रातील होड्या, उपकरणे तातडीने जप्त करावीत, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांकडून कठोर दंड वसूल करावा, महसूल, पोलिस आणि पर्यावरण विभाग यांच्यात समन्वय असावा आणि त्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पर्यावरणाला गंभीर धोका
म्हादई नदीतील बेकायदेशीर रेती उत्खनन हा केवळ कायद्याचा भंग नसून सत्तरीच्या पर्यावरणासाठी गंभीर धोका आहे. सरकारने तातडीने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई न केल्यास म्हादईचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

