IIT Goa : काहीही झालं तरी आयआयटी प्रकल्प सांगेतच होणार असा विश्वास मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला आहे. आयआयटी प्रकरणात काहीजणांकडून स्थानिकांची दिशाभूल केली जात आहे. पण स्थानिकांना विश्वासात घेत सांगेतच आयआयटी प्रकल्प करणार असल्याचं फळदेसाईंनी स्पष्ट केलं. स्थानिकांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही सुभाष शिरोडकर यांनी केलं आहे.
आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प असून त्यासाठी जमीन देणे हे सरकारचे काम आहे. काही लोकांना विरोधाला विरोध करायची सवय लागली असून या नकारात्मक विचारातून बाहेर यावे. कोणावरही अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेईल. मात्र, आयआयटी होईलच असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याआधीच स्पष्ट केले. आयआयटीच्या नियोजन संदर्भात काही दिवसांपूर्वी पणजीतल्या जीएसटी सभागृहात बैठक झाली. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
‘सध्याच्या प्रस्तावित आयआयटीची जमीन सरकारची असून काही ठिकाणी नागरिकांनी कब्जा केला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी कोणावरही अन्याय होणार नाही. ज्यांची जमीन जाणार आहे, त्यांनी आपले सर्व्हे नंबरबरोबर कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी. आपले क्लेम सादर करावेत. त्याची योग्य ती दखल सरकार घेईल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं.
तर काही लोक गैरसमज पसरवून आयआयटीला विरोध करत आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मात्र, कोणावरच अन्याय होणार नाही याची दखल सरकार घेईल, असं मंत्री सुभाष फळदेसाई यांनी म्हटलं याआधीही म्हटलं होतं.
दरम्यान सांगे येथील प्रस्तावित आयआयटी विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. 12 सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी दीड वाजता कोठार्ली येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व्हे अधिकारी पोलिस बंदोबस्तात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी समजावूनही शेतकरी भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांत झटापट होऊन चार महिला शेतकरी जखमी झाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.