House Inspection In Goa गोव्याच्या शहरांमधील घरपट्टीची फेररचना करण्यासाठी प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन छाननी करण्याचे काम नागपूरस्थित कंपनीला देण्यात आल्यानंतर हे ‘परके’ लोक घरात प्रवेश करतील आणि कागदपत्रे मागतील, या शक्यतेने राज्यातील रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
‘‘म्हापसा शहरात पालिकेने प्रत्येक घरावर नोटीस चिकटवली आहे. त्यानुसार खासगी कंपनीचे अधिकारी घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे आधारकार्ड मिळवतीलच, शिवाय घरांमध्ये नवीन बांधकाम केले, मजले चढवले असतील तर त्याचीही प्रत्यक्ष तपासणी करतील, असे कळविण्यात आले आहे,’’ अशी माहिती एका जबाबदार रहिवाशाने आज ‘गोमन्तक’ला दिली.
नगरपालिकेचे हे काम आहे. लोकांनी बेकायदा बांधकामे केली असतील किंवा नव्या खोल्या उभारल्या, मजला चढवला व ते जर वाढीव घरपट्टी भरत नसतील, तर त्यांच्यावर जरूर कारवाई करावी.
पण सरकारने अंगिकारण्याचे हे काम आहे, तुम्ही खासगी कंपनीला - तीही गोव्याबाहेरील - काम कसे देता, असा सवाल या रहिवाशांनी केला.
गोव्यात प्रत्येक मंत्री ज्या पद्धतीने खासगी कन्सल्टंट नेमतो आणि त्यावर करोडो रुपये उधळतो, त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून, कर्मचाऱ्यांकडून कामे करून न घेता खासगी कंपन्या नेमल्या जातात, हा प्रकार चुकीचा आहे, अशा भावनाही व्यक्त झाल्या.
‘‘मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे यासंदर्भात तक्रार नोंदवणार आहे. आम्ही आमच्या घरात खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना का प्रवेश द्यावा? आमची कागदपत्रे त्यांना का सुपूर्द करावीत? हा प्रकार आमच्या खासगी जीवनात हस्तक्षेप आहे,’’ अशीही प्रतिक्रिया एका नेत्याने या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
नागपूरस्थित कोलब्रो ग्रुप प्रा.लि. कंपनीला हे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार ही कंपनी राज्यातील शहरांमधील प्रत्येक घराला भेट देऊन लोकांची ओळखपत्रे, घरांच्या मान्यता, मूळ बांधकाम आराखडा व पालिकेच्या घरपट्टीच्या पावत्या तपासणार आहे.
सरकारला घरपट्टीतून मिळणारा महसूल कित्येक पटीने वाढविता येणार असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने, खासगी संस्थेकडून हे काम तातडीने करून घेण्याचे नगरविकास खात्याने ठरविले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.