
पणजी: असंसर्गजन्य आणि जुनाट आजारांवर पूर्वनिदान आणि वेळेत योग्य उपचार करता यावे यासाठी गोवा सरकारनं मंगळवारी (११ मार्च) अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि टाटा मेमोरियल केंद्राच्या सहकार्यानं सुरु करण्यात आलेला हा अभ्यास २० वर्ष चालणार आहे. हा अभ्यास गोव्याच्या आरोग्य क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊल मानले जात आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात या अभ्यासाचा शुभारंभ केला. त्यांनी सांगितलं की, "हा अभ्यास गोव्यासाठी ऐतिहासिक ठरणार असून, भविष्यात आरोग्यसेवा सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल."
"डॉक्टरांना लवकर निदान व उपचार करण्यास मदत होईल. या अभ्यासामुळं पुढील पिढ्यांसाठी आरोग्यविषयक मोठा फायदा होणार आहे. तसंच भविष्यातील धोके ओळखून प्रतिबंधात्मक उपाय आखता येतील", असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अभ्यासाचा भाग म्हणून १ लाखाहून अधिक लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले जातील. या अभ्यासातून दीर्घकालीन आणि असंसर्गजन्य आजार जसे की, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आणि अन्य आजारांची सुरुवात कशी होते, हे समजण्यास मदत होईल.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, "हा अभ्यास गोव्यामधील असंसर्गजन्य आजार (NCDs) नियंत्रित करण्यासाठी एक मोठा उपक्रम आहे. या अभ्यासाचा उद्देश गोव्यातील लोकसंख्येमध्ये कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागील कारणांचा शोध घेणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक धोरणं विकसित करणं हा आहे."
सावंत सरकारच्या या निर्णयामुळे गोव्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडेल आणि भविष्यातील आजार ओळखून वेळेवर उपचार करणं शक्य होईल.