Panaji Solar City 2025: गोव्याची राजधानी पणजीला सन 2025 पर्यंत 100% नवीकरणीय ऊर्जेवर चालणारे शहर बनविण्यासाठी राज्य सरकार 541 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या पणजीची वीजेची दैनंदिन मागणी 128 मेगावॅट इतकी आहे.
ती गरज पूर्ण करण्यासह कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या राज्याच्या योजनेचा भाग म्हणून पणजी शहराला सोलर सिटी बनविण्याची राज्या सरकारची योजना आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी अक्षय ऊर्जा डॅशबोर्डही तयार करण्यात आला आहे.
या उपक्रमात पणजी शहरात सौर रूफ टॉप उपकरणे बसविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यात छतावरील सौर ऊर्जा संयंत्रे आणि वीज निर्मितीसाठी सौर फोटोव्होल्टेइक (PV) सेल ट्री यांचा समावेश आहे.
पणजीच्या सोलर सिटी मास्टर प्लॅनमध्ये ऊर्जा-कार्यक्षमतेच्या उपायांद्वारे पारंपारिक ऊर्जेच्या मागणीत 10 टक्के कपात करण्याची योजना आहे. तसेच व्यावसायिक आणि घरगुती उर्जेच्या वापरासाठी सोलर उर्जेद्वारे बनवलेली वीज वापरण्यात येणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने बातमीत म्हटले आहे की, "नूतनीकरणक्षम ऊर्जा धोरणांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 290 कोटी रुपये आणि ऊर्जा-कार्यक्षमतेच्या धोरणांसाठी 251 कोटी रुपये खर्च केले जातील.
सध्या पणजीतील 81 गृहनिर्माण संकुलांचा या मोहिमेसाठी विचार केला जात आहे. ज्यामध्ये शहराला नवीकरणीय ऊर्जेवर 100 टक्के अवलंबून राहण्यासाठी सौर फोटोव्होल्टेइक तंत्रज्ञान दिले जाईल."
राज्य सरकारच्या कृती आराखड्यात 34.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर रूफटॉप पॉवरच्या विकासाचा समावेश आहे. सर्व प्रवासी बसेसचे विद्युतीकरण, सर्व इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी ऑफ-ग्रिड चार्जिंग स्टेशनचा विकास करणे ही कामेही केली जाणार आहेत. मोठ्या सोलर पार्कमधून सुमारे 74 मेगावॅट वीज तयार होणे अपेक्षित आहे.
राज्य सरकारला स्वच्छ ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायचे आहे. इमारतींच्या छताच्या क्षेत्राचा नकाशा तयार करण्यासाठी शहराची विविध झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक झोनमध्ये, इमारतींचे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक किंवा सरकारी असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.