पणजी: गोव्याची वेगळी ओळख निर्माण करण्यातील ‘कुणबी’ साडीचे प्रमोशन करण्यासाठी राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. परंतु विणकामाद्वारे तयार झालेल्या या ‘कुणबी‘ साडीला बाजारपेठेत पॉवरलूमद्वारे तयार होणाऱ्या साडीचे तगडे आव्हान आहे.
पॉवरलूमवर तयार होणाऱ्या ‘कुणबी’ साड्या हँडलूमच्या साड्या म्हणून विक्री होते, त्यामुळे अशी फसवी विक्री होऊ नये, यासाठी विणकामाच्या साडीला भौगोलिक संकेताची (जीआय) ओळख म्हणून मान्यता मिळणे अत्यंत गरजेचे बनले आहे, असे स्नेहा नाईक सांगतात.
श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ‘अमेझिंग गोवा २०२४’ या परिषदेत ‘कुणबी गोवा’ हस्तकलेचा स्टॉल उभारणाऱ्या स्नेहा नाईक ‘गोमन्तक''ला सांगत होत्या. जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या अंतर्गत पेडणे गटातून आलेल्या नाईक यांचा स्टॉल आहे. त्या म्हणतात, कुणबी साडी म्हणून ब्रँड तयार आहे, पण विणकामाद्वारे तयार होणाऱ्या साड्यांची बाजारात विक्री ज्या गतीने व्हायला हवी, ती होत नाही.
कारण या साड्यांना बाजारात पॉवरलूमवर बनवल्या जाणाऱ्या साड्यांचे तगडे आव्हान मिळत आहे. त्याशिवाय विणकाम केलेल्या साड्यांची किंमत ३ ते पाच हजारांपर्यंत राहिल्याने ग्राहक वारंवार त्या साड्या खरेदी करत नाहीत. तसेच या साड्या लग्नसराईतही फार कमी वापरल्या जातात.
कुणबी साडीला राज्य सरकारने जीआय टॅग मिळवून दिल्यास निश्चित त्याचा परिणाम या उद्योगावर होईल, असे सांगत नाईक म्हणतात, एक साडी बनविण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागतात, शिवाय साडी विक्रीनंतरच गटातील महिलांना पैसे देता येतात.
बांबोळी येथे सुरू असलेल्या अमेझिंग गोवा परिषदेत एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सर्वात लांब कुणबी साडीचा जागतिक विक्रम नोंदवला गेला असून, ही कुणबी साडी १०२ मीटर लांब आहे. या आधी हातमागावरील सर्वांत मोठ्या कुणबी साडीची लांबी ४० मीटर होती. हा उपक्रम राय येथील ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीतर्फे केला आहे.
कुणबी साड्यांना ग्राहकांच्या मागणीनुसार आता विविध रंगांत उपलब्ध करून देत आहोत. पूर्वी लाल रंगात ‘कुणबी’ मिळायची. आता आम्ही निळा, ऑरेंज, लाल, हिरवा, लाईट रंगामध्ये ‘कुणबी’ घेऊन आलो आहोत. याशिवाय आता ‘कुणबी’ पासून विविध प्रकारचे पेहरावही करण्यात आले आहेत. त्यात फ्रॉक, जॅकेट, दोन मिनिटांत कुणबी साडी नेसणे (इन्स्टंट), त्याशिवाय टोप्या, शॉल, भिंतीवर लावण्यासाठी शोभेच्या वस्तूही ‘कुणबी’चा वापर करून बनवल्या आहेत. जेवढ्या लवकर ‘कुणबी’ला जीआय टॅग मिळेल, तेवढ्या लवकर या व्यवसायाला त्याचा निश्चित फायदा होईल, अशी आपले मत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.