Panjim Smart City: राजधानी पणजी शहरात सध्या सगळीकडे खोदकाम सुरू आहे. गटारे, नाले, रस्त्यांची तोडफोड केल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. मात्र सर्व सरकारी यंत्रणा आपले अंग झटकत आहेत. हा अंदाधुंद कारभार स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोटारसायकलवरून फिरून पाहावा.
तरच सर्वसामान्य माणसाच्या व्यथा त्यांना कळतील, अशी संतप्त प्रतिक्रिया उद्योगपती व पणजीचे नागरिक मनोज काकुलो यांनी व्यक्त केली. गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमातील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. माजी महापौर उदय मडकईकर हेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना आमचा विरोध नाही. ते अत्यावश्यकच आहेत. परंतु अशा प्रकारच्या कामांपूर्वी स्थानिक पणजीकरांना विश्वासात घ्या, योग्य नियोजन करा. कारण पर्यटन, उद्योग, सरकारी कार्यालये अशा सर्वार्थाने पणजी महत्त्वपूर्ण आहे. ती राज्याचा महत्त्वपूर्ण कणा आहे. परंतु शहरात महानगरपालिकेद्वारे अंदाधुंद कारभार सुरू असून, पणजीला कोणी वाली राहिलेला नाही, अशी खंत काकुलो यांनी व्यक्त केली.
‘तो’ कंत्राटदार सरकारी जावई!
पणजीच्या मध्यवर्ती सरस्वती मंदिरासमोर जो रस्ता खोदला आहे, तेथे काम कमीच पण गोदामाचे स्वरूप अधिक आलेले आहे. मोठमोठे पाईप्स, रस्त्यासाठी लागणारे साहित्य येथे जमा करण्यात आले आहे. तेथे काम करत असलेल्या कंत्राटदाराला पणजीतील 50 टक्क्यांहून अधिक कामे मिळाली असून, तो सरकारी जावई आहे काय? असा प्रश्न पडत आहे.
शहरातील कामांची पाहणी करण्यासाठी समिती नेमावी तसेच दोन-तीन शिफ्टमध्ये कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. कारण पावसाळ्यापूर्वी जर ही कामे पूर्ण झाली नाहीत तर पणजीची स्थिती भयावह होऊ शकते.
फलक लावणे बंधनकारक करावे- काकुलो
कोणताही सरकारी प्रकल्प उभारताना कंत्राटदाराचे नाव, अभियंत्याचे नाव, लागणारा कालावधी आदी माहिती असलेला फलक लावला जातो. मात्र पणजी शहरात एवढी कामे सुरू आहेत, ती कोण करतोय?, ही कामे पूर्ण होण्याचा कालावधी किती?, याबाबतचे फलकच लावलेले नाहीत. त्यामुळेच सर्वांचे फावते.
महापौर मार्चपर्यंत कामे पूर्ण होणार म्हणून सांगत आहेत. परंतु ती कशा पद्धतीने पूर्ण करणार, त्यासाठी कोणते नियोजन केले आहे, याबाबत काहीच बोलत नाहीत. पणजीवासीयांना अंधारात ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. जर मार्चपर्यंत ही कामे पूर्ण झाली नाहीत तर पणजीच्या जनतेला सामोरे जाण्यास महापौर रोहित मोन्सेरात यांनी तयार राहावे, असा इशारा मनोज काकुलो यांनी यावेळी दिला.
मार्चपर्यंत कामे पूर्ण होणे अशक्य- मडकईकर
नागरिक तसेच पणजी शहराच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कामांना पणजी महानगरपालिकेने अगोदरच प्राधान्य द्यायला हवे होते. परंतु कोठे ज्ञानसेतू उभार, कोठे वॉकिंग ट्रॅक बांध आणि अशा कमी महत्त्वाच्या कामांवर वेळ घालविला. त्यामुळे शहराच्या अनुषंगाने जी अतिमहत्त्वाची कामे होती, ती मागे राहिली.
थोडा जरी पाऊस पडला की पणजी तुंबते, रस्ते बुडतात, त्याचे काय?. गेल्या सात वर्षांपासून पडून असलेली कामे अवघ्या सात महिन्यांत कशी काय पूर्ण होतील?. पणजी महानगरपालिकेला ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत केंद्राकडून सुमारे 600 कोटी रुपये मिळणार आहेत आणि त्यासाठीच हा खटाटोप आहे, असा सनसनाटी आरोप माजी महापौर उदय मडकईकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.