

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) गोवा सरकारने आरोग्य खात्यात विविध ५९ पदांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य संचालनालयामार्फत यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विविध पदांसाठी पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ६ हजार ते ८५ हजार रुपयांपर्यंतचे वेतन निश्चित करण्यात आले आहे.
आरोग्य खात्याने ज्या ५९ कंत्राटी पदांसाठी जाहिरात दिली आहे, त्यात वैद्यकीय अधिकारी, ब्लॉक एपिडेमिओलॉजिस्ट, श्रवणशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्स, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, पंचकर्म थेरपिस्ट आणि संगणक साहाय्यक यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
या कंत्राटी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण अटी ठेवल्या आहेत:
वयोमर्यादा: उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.
रहिवासी दाखला: अर्जदारांना १५ वर्षांचा गोव्यातील रहिवासी दाखला अनिवार्य असेल.
भाषिक ज्ञान: उमेदवारांना कोकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
निवडलेल्या उमेदवारांना गोव्यातील विविध ठिकाणी नियुक्त केले जाईल. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना भविष्यात सरकारी नोकरीत कायमस्वरूपी समाविष्ट करण्याची कोणतीही हमी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट अटही घालण्यात आली आहे.
आरोग्य खात्यासोबतच शिक्षण क्षेत्रातही कंत्राटी भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत ६६ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या कार्यालयात ४, ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. ही माहिती अभियानाचे प्रकल्प संचालक शंभू घाडी यांनी जारी केलेल्या जाहिरातीत देण्यात आली.
या ६६ पदांमध्ये ब्लॉक रिसोर्स पर्सन (७), ब्लॉक समन्वयक (१), क्लस्टर रिसोर्स पर्सन (३), अकाउंटंट (४), डेटा एन्ट्री ऑपरेटर (२), आणि मल्टिटास्कर (१) अशा प्रमुख पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, फाईन आर्ट, इंडियन क्लासिकल डान्स (गायिका आणि वादक), वेस्टर्न म्युझिक आणि थिएटर आर्ट इन्स्ट्रक्टर अशा कला शिक्षण क्षेत्रातील ४८ पदेही भरली जाणार आहेत. या पदांसाठी ११ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतचे वेतन देण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.