Pooja Naik Case Highlights Government Job Scam In Goa
मिलिंद म्हाडगुत
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका इसमाला १४ लाख रुपयांचा गंडा घातल्यामुळे परवा पूजा नाईक या महिलेस अटक करण्यात आली. तिला अटक झाली असली तरी यामुळे अनेक प्रश्न पृष्ठभागावर यायला लागले आहेत.
मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीने पूजाला नोकरी करता पैसे दिले त्याने ते स्वेच्छेने दिले यात शंकाच नाही. समजा पूजाने त्या व्यक्तींच्या दोन्ही मुलांना सांगितल्याप्रमाणे नोकरी दिली असती तर हा मामला चव्हाट्यावर आलाच नसता. म्हणजे महत्त्व आहे ते नोकरीला, पैशांना नव्हे! आज प्रत्येक बेरोजगार व्यक्ती येनकेन प्रकारेण सरकारी नोकरी मिळवण्याच्या खटपटीत असतो.
सरकारी नोकरी मिळणे म्हणजे सध्या गुलबकावलीचे फुल मिळण्यासारखे झाले आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी असला की वस्तूचे मूल्य वाढायला लागते हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. याचाच फायदा मग पूजासारखे लोक घेत असतात. पूजासारख्या सामान्याचे सोडा, आज नोकरी देण्याकरता आमदार मंत्र्यांवर प्रचंड दबाव असतो. आमदार,मंत्र्यांचे भवितव्य आज नोकर्यांवर अवलंबून असल्याचे दिसायला लागले आहे. जो आमदार आपल्या मतदारसंघात जास्त नोकऱ्या देतो तो खरा यशस्वी, असे नवे समीकरण आज अस्तित्वात यायला लागले आहे.
विशेष म्हणजे या नोकऱ्यांत खाजगी नोकऱ्यांना स्थान नसते. प्रत्येक जण आशा करत असतो ती सरकारी नोकऱ्यांची. याकरता बेरोजगार किंवा त्यांचे पालक कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यांची ही मानसिकताच मग त्यांना पूजासारख्या व्यक्तींकडे जाण्यास प्रवृत्त करत असते. त्यातले धोके त्यांना यामुळेच दिसत नसतात. आता ज्यांचा ‘गॉडफादर’ आहे त्यांना अशा व्यक्तींशी संबंध साधण्याची गरज भासत नाही. पण सगळ्यांनाच काही गॉडफादर असतात असे नाही. त्याचाच फायदा मग संधीसाधू लोक घेत असतात. आता वर नमूद केल्याप्रमाणे यात पैशाचा प्रश्न गौण असतो किंवा नोकरी मिळाल्यानंतर तो गौण ठरतो, असे म्हणावेलागेल.
एकदा का सरकारी नोकरी मिळाली की आपले जीवन सफल झाले अशी धारणा आज बेरोजगार व त्यांच्या पालकांत वसायला लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी, ‘नोकऱ्यांचा धंदा बंद करा’, असे जे आवाहन केले ते स्वागतार्ह असले तरी सरकारी नोकरीकरता इच्छुक असलेल्या युवक युवतींचे काय, हा प्रश्नही उपस्थित होतो. ‘नोकरी देण्याकरता पैसे मागितले तर त्याची तक्रार करा’, असे जे मुख्यमंत्री म्हणतात ते ठीक असले तरी त्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाही, हेही तेवढेच खरे आहे.
मुळात पैसे देण्याबाबत त्यांची तक्रार नसतेच. तक्रार असते ती नोकरी देण्याबाबत. त्यामुळे तक्रार दिल्यानंतर आपल्याला नोकरी मिळणार की काय, असा प्रश्नही तो विचारू शकतो. शेवटी पैसे घेणाऱ्याएवढाच पैसे देणाराही गुन्हेगार असतो, हे विसरता कामा नये. टाळी ही दोन हाताने वाजत असते याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
आज सरकारी नोकरी मिळवण्याकरता तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेपोटीच विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांची भरती राज्य कर्मचारी आयोगातर्फे करण्याचे जाहीर केले केले आहे. याचा अर्थ निवड मेरीटवर होणार असा होऊ शकतो. पण शेवटी मेरिट म्हणजे काय, हाही प्रश्न उपस्थित होतो.
लेखी परीक्षेत जर समान गुण मिळाले तर शेवटी मुलाखतीचा आधार घेतला जातो आणि मुलाखती या सापेक्ष असतात. त्यांचा निकष परिस्थितीनुसार बदलू शकतो. यात मंत्री व आमदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यापेक्षा जर मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक दर्जाप्रमाणे गरजवंतांना नोकऱ्या दिल्या तर सर्व प्रश्न निकालात निघू शकतात. पण हे वाटते तेवढे सोपे नाही. आज बेकारीचा अजगर एवढा फुगायला लागला की त्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळ्यांना सरकारी नोकऱ्या देणे शक्य नाही हे कटू असले तरी सत्य आहे. त्याकरता सरकारने खाजगी क्षेत्र बळकट करण्याचे बघितले पाहिजे.
काही देशात सरकारी आस्थापनात भांडवल गुंतवून सरकार त्या आस्थापनाचे भागीदार बनत असतो. त्यामुळे मग या आस्थापनावर सरकारचे नियंत्रण राहत असते. त्याचा फायदा राज्यातील युवकांना रोजगार मिळण्यात होऊ शकतो. गोव्यात या उपक्रमाचा अवलंब केल्यास त्याचा फायदा राज्यातील बेरोजगारांना होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.