

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) रुग्णांना यापुढे टोकन देण्यात येणार नाही. डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य राहणार असल्याचे परिपत्रक व्यवस्थापनाने जारी केले आहे.
गोमेकॉत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना यापूर्वी प्रत्येक ओपीडीत टोकन दिले जायचे. त्या क्रमानुसार रुग्णांवर उपचार होत होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने काही ओपीडींमध्ये टोकन क्रमांक देण्याऐवजी प्राथमिक टप्प्यावर ऑनलाइन नोंदणी सुरू केली होती.
त्यानुसार ही प्रक्रिया सुरू होती. तिला यश मिळत असल्याने तसेच रुग्णांना वेळेतच आवश्यक त्या डॉक्टरांना भेटता येत असल्याने प्रशासनाने आता टोकन देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे रुग्णांना ओपीडीनुसार ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
ज्या रुग्णांनी आधी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, अशा ‘वॉक-इन’ रुग्णांना संबंधित ऑफलाइन नोंदणी किंवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या (पीडब्ल्यूडी) काऊंटरवर जावे लागणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो रुग्ण दररोज गोमेकॉला भेट देत असतात. त्यामुळे प्रत्येक ओपीडीतील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत असतो.
त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेत डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठीच टोकन प्रथा बंद करून ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था सुरू करण्यात आल्याची माहिती गोमेकॉतील सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.