पणजी : महिलांवरील अत्याचारांची व इतर प्रकरणे हाताळणाऱ्या राज्य महिला आयोगाला (State Women Commission) मुलींना शालेय दशेतच स्वसंरक्षणाचे धडे (Self Defence) दिले जावेत, अशी शिफारस राज्य सरकारला केली जाणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे यांनी दिली. असे प्रशिक्षण (Trainning) मुलींना मिळणे ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
शाळांतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे महिला आयोगामार्फत देण्याचा विचार पुढे आला होता. कोरोनापूर्वीच्या काळात हा विषय आला होता. मात्र, नंतर महामारीमुळे शाळा बंद झाल्याने हा विषय मागे पडला. शाळा अजून सुरू होऊ शकलेल्या नसल्याने हा विचार पुढे जाऊ शकलेला नाही, असे गावडे यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी इतर राज्यांतील महिला आयोग आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आपण याविषयी सूचना मांडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अभ्यासक्रमांतर्गतच द्यावे प्रशिक्षण
मुलींना स्वसंरक्षणाचे अशा प्रकारे धडे द्यायचे झाल्यास ते अतिरिक्त काम होईल. त्यापेक्षा शालेय अभ्यासक्रमाच्या अंतर्गतच आणि शारीरिक शिक्षणाचा एक भाग बनवून, असे प्रशिक्षण घ्यायचे आणि त्याअंतर्गत स्वसंरक्षणाचे पाच प्राथमिक प्रकार शिकवायचे. सक्तीचा विषय असल्यामुळे आणि अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे दहावीपर्यंत पाच प्रकार मुले सहज शिकतील, असे आपण सूचना मांडताना त्यावेळी नजरेस आणून दिले होते, असे गावडे यांनी सांगितले.
शालेय वयातच शिकणे योग्य
प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षक हे असतातच. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यानंतर मुलींबरोबर मुलांनाही हे शिक्षण द्यायचे, अशी सूचना आपण मांडली होती, असे गावडे यांनी सांगितले. यामुळे मुलींना मुद्दामहून वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज भासणार नाही आणि लहानवयात मुले असे धडे लगेच शिकतात, असे गावडे पुढे म्हणाल्या. राज्य महिला आयोगाकडून सरकारला ज्या शिफारशी केल्या जाणार आहेत, त्यात या शिफारशींचाही समावेश राहणार आहे. सरकारला कुठल्या शिफारशी कराव्यात हे ठरविण्यासाठी नुकतीच आयोगाची बैठक झाली आहे, असे गावडे यांनी स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.