Goa: गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत यंदा 'कृत्रिम' तळ्यात गणपतींचे विसर्जन होणार?
डिचोली: डिचोली शहरात (Bicholim) दरवर्षी सर्वत्र नदी वा नैसर्गिक तलावात गणपती विसर्जन करण्यात येत असतानाच, शहरातील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत (In the housing board colony) यंदापासून 'कृत्रिम' तळ्यात (In the 'artificial' pond) गणपतींचे विसर्जन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्तांची अडचण लक्षात घेवून प्रभाग एक मधील मोकळ्या जागेत छोटे 'कृत्रिम' तळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी हालचालीही सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांची ही संकल्पना असली, तरी गणेशभक्तांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकावेळी साधारण गणपतीच्या 30 मूर्ती विसर्जित करता येईल. असे नियोजन करून हे तळे बांधण्यात येणार आहे. या कामासाठी जवळपास लाखभर रुपये खर्च येणार असून, गणेशभक्तच स्वतःहून हा निधी उभारणार आहेत. कृत्रिम तळे उभारण्याच्यादृष्टीने प्राथमिक कामालाही सुरवात झाली आहे. या कृत्रिम तळ्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्ती विसर्जित करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.
दरम्यान, गृहनिर्माण वसाहतीत बालोद्यानासाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागेत चालू असलेल्या कामामुळे काही नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. बेकायदेशीरपणे बांधकाम सुरु असल्याचा दावा करून पालिकेला निवेदनही देण्यात आले आहे. मात्र गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळे बांधण्यात येणार असून, पालिकेत तसा ठरावही घेण्यात आलेला आहे. हे तळे तात्पुरते असल्याचे नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी स्पष्ट केले आहे.
संकल्पने मागील कारण
गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत विविध भागातील नागरिकांनी घरे बांधून ते याठिकाणी कायमचे वास्तव्य करून आहेत. पैकी काहीजण चतुर्थीत गृहनिर्माण वसाहतीतील निवासस्थानीच गणपती पूजन करतात. मागील वर्षीपर्यंत या गणेशभक्तांकडून गृहनिर्माण वसाहत परिसरातील एका विहिरीत गणपतींचे विसर्जन करण्यात येत आले आहे. मात्र विहिरीत विसर्जन करताना येणाऱ्या अडचणींमुळे आता कृत्रिम तळ्याची संकल्पना समोर आली आहे.
कृत्रिम तळे उभारावे.अशी गणेशभक्तांचीही मागणी आहे. कृत्रिम तळ्यात गणपतींचे विसर्जन सुरळीतपणे करता येणे शक्य असून, प्रदूषणाचीही निर्माण होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
बैठकीत सहमती
कृत्रिम तळे बांधण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी नगरसेवक नाटेकर यांनी अलिकडेच गृहनिर्माण वसाहतीतील रहिवाशांची बैठक घडवून आणली. या बैठकीस हावजिंग बोर्ड सोसायटीचे अध्यक्ष प्रा. प्रवीण सावंत, सूर्याजीराव राणे, राधीया देसाई, नारायण नाईक, गजानन नाईक, विनय नेवगी, राघवेंद्र कुलकर्णी, सदानंद फडते, दीपक जोशी, रमेश नाईक, गौरव चोडणकर, पांडुरंग गाड, ब्रह्मचैतन्य मंत्री आदी रहिवासी उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी कृत्रिम तळे प्रकल्प कल्पनेला सहमती दर्शवून निधी उभारण्याचा संकल्प केला. कोणीही प्लास्टिक ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींचे पूजन करू नये.असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
प्रदूषण टळणार
कृत्रिम तळ्यात गणपतींचे विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी आतिल चिकण माती बाहेर काढण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीही विसर्जन करता येणार नाहीत. त्यामुळे प्रदूषणाची समस्या होणार नाही. मोकळ्या जागेत बालोद्यान वा अन्य प्रकल्प उभारण्याचे झाल्यास उपाययोजना काढण्यात येईल.
-विजयकुमार नाटेकर, नगरसेवक.
गणेशभक्तांना सेवेची संधी
विहिरीत गणपतींचे विसर्जन भक्तीभावे करायला मिळत नाही. त्यातच अडचणींही येतात. आता कृत्रिम तळ्यात का असेना, गणपती बाप्पाचे निर्विघ्नपणे विसर्जन करता येणार आहे. सर्व गणेशभक्तांना डोळेभरून 'बाप्पा'ना निरोप देता येणार आहे.
-सौ. राधिया देसाई, महिला गणेशभक्त.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.