Goa Forward Party: विविध सोहळे, सभा, परिषदा, संमेलने यांच्या आयोजनातून सरकारी पातळीवर कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे होत असून 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गोवा परिषदेच्या आयोजनात 2 कोटी खर्च करण्यात आले, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आहे.
गुरुवारी पणजीत पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो आणि परिषदेच्या आयोजनासाठी 2 कोटी खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
या परिषदेत तब्बल 17 सामंजस्य करार करण्यात आले, असंख्य कंपन्यांनी गोव्यात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील, असे नंतर मंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आरटीआयद्वारे प्राप्त माहितीतून तसा कोणताही करार झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. यावरून सदर परिषद हा घोटाळा होता या आरोपात तथ्य आहे, असे कामत यांनी सांगितले.
आता हेच सरकार 'इन्वेस्ट गोवा 2024' या नावाने परिषद आयोजित करत असून त्यावर तब्बल 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. केवळ एका दिवसाच्या परिषदेवर एवढा अफाट खर्च का? असा सवाल कामत यांनी उपस्थित केला.
हा सर्व पैसा करदात्यांच्या घामा कष्टाचा असून त्याची अशी उधळपट्टी करण्याचा अधिकार सरकारला नाही, असे ते म्हणाले.
खरे तर अशाप्रकारे सोहळ्यांवर उधळपट्टी करण्यापेक्षा हेच पैसे - तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करण्यासाठी वापरले असते तर सत्कारणी लागले असते.
त्याचे कौतुकही झाले असते. आज राज्यात असंख्य उद्योग असले तरीही त्यांना लागणारे कुशळ मनुष्यबळ उपलब्ध नाही. फार्मा उद्योगात हे चित्र प्रामुख्याने दिसून येत आहे, असे कामत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.