Goa Forward Party : सरकारी प्राथमिक शाळा इतर शाळात विलीन करण्याचा गोवा सरकारचा निर्णय मूर्खपणाचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि प्राथमिक शिक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा अशी मागणी गोवा फॉरवर्डने केली आहे. गोवा फॉरवार्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा साधला.
सरकार गोव्यातील सुमारे 200 प्राथमिक शाळा अन्य शाळांमध्ये विलीन करण्यास पाहत असून एव्हढा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारला पालक शिक्षक संघटनांनाही विश्वासात घ्यावे असे वाटले नाही. मागच्या रविवारी भाग शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या एका गुगल मीटमध्ये घाईघाईने हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप दुर्गादास कामत यांनी केला. नीती आयोगाने गोवा सरकारला 7 ऑगस्ट पर्यंत या संबंधी निर्णय घ्यायला लावला असल्याने मुख्यमंत्री कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर परिणाम होऊन शिक्षण ग्राम पातळीवर नेण्यासाठी सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या धोरणाच्या ते विपरीत होणार आहे. लहान मुलांना जो शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे त्याचीही ही पायमल्ली असून गोवा फॉरवर्ड पार्टी हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत अमलात आणू देणार नाहीत. या निर्णयाला विरोध करणाऱ्या सर्व पालकांमागे गोवा फॉरवर्ड खंबीरपणे उभा असे आश्वासन कामत यांनी दिले.
गोव्यातील अंगणवाड्या आणि बालवाड्या शैक्षणिक संस्थांनी ताब्यात घेण्यासाठी जे परिपत्रक जारी केले आहे तेही कायदाबाह्य असून अंगणवाड्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे चालविले जात असून शैक्षणिक संस्था शिक्षण खात्या अंतर्गत चालते याकडे त्यांनी लक्ष वेधले. कालांतराने या अंगणवाड्याच बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.