
Satyapal Malik Goa Relation: गोवा, जम्मू-काश्मीर आणि मेघालय यांसारख्या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांचे मंगळवार (दि.५) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ जरी अल्प असला, तरी या राज्याशी त्यांचे एक खास भावनिक नाते जोडले गेले होते. गोव्याच्या जनतेला निरोप देताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
२०२० मध्ये मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी गोवा सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी गोव्यातील आपला १० महिन्यांचा अनुभव 'अत्यंत आनंददायी' असल्याचे सांगितले होते. गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि येथील प्रेमळ, उदार लोकांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. 'गोवा हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथील लोक खूप प्रेमळ आणि उदार आहेत. मला गोव्याच्या लोकांपासून खूप प्रेम मिळाले. गोवा ही एक अद्वितीय ओळख असलेले राज्य आहे. येथील लोकांची जगण्याची एक वेगळीच पद्धत आहे,' अशा शब्दांत त्यांनी गोव्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले होते.
मलिक यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळातच ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामुळे त्यांच्या नावाची देशभर चर्चा झाली होती. गोव्याहून मेघालयला रवाना होताना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
गोव्याच्या जनतेला निरोप देताना मलिक यांनी लिहिले होते की, 'मी उद्या निघत असताना, गोव्याच्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तसेच, हे राज्य कायम आपल्या एकजुटीने आणि सलोख्याने मजबूत राहो.' त्यांचे हे शब्द गोव्याशी असलेले त्यांचे भावनिक नाते दर्शवतात. मलिक यांनी दिलेला निरोप हा केवळ एका राज्याला दिलेला निरोप नव्हता, तर एका सुंदर आठवणींना दिलेली भावनिक साद होती. त्यांच्या निधनाने गोव्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून, गोव्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाला विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.