
Surla farmers water supply
साखळी: खंदकातील पाणी शेतीसाठी पुरविणारे गोवा हे पहिले राज्य बनले असून या योजनेचा शुभारंभ सुर्ल गावात होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. आता सुर्लतील शेतकऱ्यांनी पाणीवाटप सोसायटीमार्फत योग्य पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करून आदर्श पाणीवाटप संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करावा.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्प्रिंकलर व इतर माध्यमांतून स्वयंचलित पद्धतीने हे पाणी शेतीसाठी उपलब्ध करणारी ही योजना देशासाठी आदर्श ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सुर्ल येथे जलस्रोत खात्यातर्फे ४ कोटी खर्चून खाण खंदकातील पाणी शेतीला पुरवणाऱ्या स्वयंचलित प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता प्रमोद बदामी, शैलेश पोकळे, नरेश पोकळे, विनोद भंडारी, किशोर भावे, कालिदास बर्वे, सरपंच साहिमा गावडे, उपसरपंच सुभाष फोंडेकर, विश्रांती सुर्लकर, भोला खोडगीणकर, दिनेश मडकईकर, सुचिता गावकर, शाणू सुर्लीकर, फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात शेती आहे. ती ओलिताखाली आणण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प वरदान ठरेल. स्वयंचलित सिंचन प्रणाली पाण्याचा वापर ४० टक्क्यांपर्यंत कमी करते, ज्याचा वापर अधिक जमीन सिंचनासाठी केला जाऊ शकतो. तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठादार फिनोलेक्समार्फत कंत्राटदाराद्वारे ही प्रणाली चालविली जाईल आणि त्याची देखभाल केली जाईल. त्यानंतर ती विभागाकडे सोपविली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सुर्ल येथील मुख्य खाण खंदकातील पाणी खालच्या खंदकात आणून त्याठिकाणी स्वयंचलित यंत्रणा (मोटर्स) बसविली असून फिनोलेक्स कंपनीतर्फे आधुनिक तंत्र वापरून एक प्रोग्रॅम सेट केला आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्प्रिंकलर्समार्फत शेतीला पाणी मिळेल. हे तंत्र वापरून सर्व शेतकऱ्यांना आळीपाळीने सिंचन व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वरदान ठरेल, अशी माहिती मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.