Ganesh Chaturthi 2023 गोमंतकीयांचा सर्वांत मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी. हा उत्सव आता जवळ आला आहे. श्रावण महिन्यात तसेच गणेश चतुर्थी काळात सर्वत्र ऐकू येतात ते भजनाचे स्वर. भजन म्हटले की पखवाज व हार्मोनियम ही वाद्यवृंदे आलीच.
त्यामुळे या वाद्यांच्या दुरुस्तीसाठी सध्या हेडलॅण्ड-सडा येथे पंढरपूरहून आलेल्या कारागिरांकडे गर्दी वाढू लागली आहे. नवीन वाद्यवृंदे खरेदी करण्यापेक्षा वाद्ये दुरुस्त करण्याकडे भजन कलाकारांचा कल आहे. तबला, पखवाज, ढोलकी, हार्मोनियमच्या दुरुस्तीसाठी मोठी झुंबड उडत आहे.
पंढरपूर येथील ‘संतोष तबला मेकर्स’ खास भजनी कलाकारांच्या सेवेसाठी हेडलॅण्ड-सडा येथील श्री ईस्वटी लक्ष्मी नारायण मंदिराजवळ गेल्या १५ वर्षांपासून येतात. दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थीनिमित्त येऊन ते वरील वाद्यवृंदे दुरुस्त करून देतात.
आपल्या घरातील गणेश चतुर्थी सोडून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे कारागीर वाद्यांची दुरुस्ती करतात. संतोष भोसले व त्यांचे वडील नागनाथ भोसले हे कलाकारांना पखवाज, तबला, हार्मोनियम, वीणा, ढोल, ताशे व इतर सर्व प्रकारची वाद्ये दुरुस्त करून देतात.
तसेच त्यांच्याकडे नवीन वाद्येसुद्धा मिळतात. संतोष भोसले यांना स्वरांचे ज्ञान असल्यामुळे ही दुरुस्त केलेली वाद्ये योग्य प्रकारे ‘ट्यून’ झाली आहेत का हे तपासण्यासाठी ते स्वतः दुरुतीनंतर ती वाजवून पाहतात.
वाद्यांची योग्यरित्या दुरुस्ती करणे तसेच योग्य ‘ट्युनिंग’ करून देणे हेच आपल्या कामाचे समाधान आहे, असे संतोष भोसले म्हणतात. तबल्यासाठी लागणारे सिसमचे लाकूड मेरठमधील नागरडी येथून येते. त्याच्याही किमती वाढल्या आहेत.
तबल्याला लागणारी लोखंडाची राख अर्थात शाईच्या दरातही वाढ झाली आहे. हार्मोनियममध्ये पंजाब मॉडेलला मागणी अधिक आहे. त्याच्या दुरुस्तीचे साहित्य मुंबई, पंजाब, नागपूर, कोलकाता येथून कोल्हापूरात येते. त्यांच्याही किमती वाढल्या आहेत, असे भोसले सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.