
पणजी: गोवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात मोठी कारवाई करत एकूण २ लाख ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गूळ, जिन आणि फायरबॉल व्हिस्की या पदार्थांमध्ये मान्यताप्राप्त अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन संचालक श्वेता देसाई यांनी दिली.
उत्तर गोवा व दक्षिण गोव्यात निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थ आणि मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी निर्णय देत संबंधित व्यावसायिकांना आर्थिक दंड ठोठावला आहे.
टार्ट्राझीन आणि सनसेट यलो हे कृत्रिम रंग गुळामध्ये आढळले असल्याने अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ नुसार राजीव ट्रेडर्स, आनंद विहार, पेडे, दीपक ट्रेडर्स, सत्तादर आर्केड, पेडे आणि आर्यन मिनी सुपर मार्केट, महाखाजन, धारगळ, पेडणे याना प्रत्येकी ३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
उदयपूर गुलाब जिनमध्ये ‘एरीथ्रोसीने’ नावाचा कृत्रिम रंग आढळला असून अन्न सुरक्षा नियम २०११ नुसार गालेस्टॉम डिस्टिलरी
प्रा. लि., पिसुर्ले इंडस्ट्रियल इस्टेट, सत्तरी, स्टॉकहोम डिस्टिलर्स ॲण्ड विंटर्स प्रा.लि., जर्नालिस्ट कॉलनी, पर्वरी आणि फेदर वेट वाइन्स, बागवाडो, मोरजी या आस्थापनांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
फायरबॉल व्हिस्की या मद्यात अन्न सुरक्षा व मानके नियम २०१८ नुसार निर्धारित व्हिस्कीच्या निकषांचे पालन न केल्याचे आढळल्याने मायकल जॉन डिसोझा, कुंकळ्ळी औद्योगिक क्षेत्र, विवेक केरकर, करासवाडा-म्हापसा आणि विश्वेंद्र सिंग तोमर, नारोजीवाडा, मोरजी येथील व्यावसायिकांवर कारवाई केली असून मायकल याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्यासाठी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. भविष्यात असे प्रकार आढळल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल. गोवा अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा कायद्यानुसार ही कारवाई केली असून, भविष्यात अशा प्रकारच्या उल्लंघनांविरोधात अधिक तीव्र कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवार, ११ रोजी दवर्ली-मुगाळी भागात तपासणी मोहीम राबवून २५ किलो अन्नपदार्थ जप्त केले. या अन्नपदार्थांमध्ये फ्रायम्स, तळलेले हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे यांचा समावेश होता.
हे पदार्थ अस्वच्छ परिस्थितीत आणि वैध ‘एफएसएसएआय’ परवाना नसताना पॅक केले जात होते. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत आवश्यक असलेल्या लेबल घोषणेचा अभाव असल्याने सुमारे १६,००० रुपये किमतीचे अन्नपदार्थ जप्त आणि नष्ट करण्यात आले. २ युनिट्सवर कारवाई करत त्वरित उत्पादन थांबवण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहे.
सासष्टी तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाकडून सोमवारी (ता.१०) नियमित तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या तपासणीत वैध अन्न परवाना नसलेले आणि अस्वच्छ स्थितीत नमकीन उत्पादन युनिट असल्याचे आढळले. सुमारे पाच युनिट फ्रायम्स आणि नमकीनचे उत्पादन व पॅकिंग करताना आढळून आली. त्यामुळे त्यांना काम बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. विविध निकषांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.