Goa Arambol Land Conversions
हरमल: गोव्यात जमिनी रुपांतरण प्रश्न गाजत असून सपाट जमिनीबरोबरच प्रत्येक गावातील डोंगर,नदी, नाले तसेच ‘ना विकसित क्षेत्र’मध्ये जमिनीचे घाऊक पद्धतीने रुपांतरण चालूच आहे. याबाबत स्थानिकांमध्ये उद्रेक आहे. जमिनीच्या नोटीस टप्याटप्याने प्रसिद्ध होत असल्याने, जनेतचा उद्रेक होण्यापूर्वी भाजप सरकारने जनभावना ओळखून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान,नगर नियोजन कायद्यातील सुधारित दोन कलमानुसार रुपांतरण होत आहे, हे अंत्यत चुकीचे असून, त्यात ग्रामस्थांच्या मताचा आदर करून सन्मानाने रूपांतरण रद्द करण्याची मागणी युवा वर्ग करीत आहे. परवाच्या ‘सेव्ह गोवा,सेव्ह सॉईल’, या जागृती बैठकीस राज्यातील अनेक संघटनाचे नेते उपस्थित राहिले. त्यात वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा सहभागी झाल्याने ग्रामस्थांच्या भूमिकेला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या पंचायत क्षेत्रातील वरचावाडा भटवाडी भागातील अंदाजे ३.५ लाख चौरस मीटर जमिनीचे रुपांतरण प्रक्रिया सुरू केली होती. गेल्या आठवड्यात नागरिकांनी आमदार जीत आरोलकर तसेच माजी मुख्यमंत्री तथा भटवाडी वाड्यावरील रहिवाशी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासमवेत बैठक घेतली व प्राणपणाने विरोध करण्याचे ठरले होते.ह्याशिवाय कायदेशीर पद्धतीने रुपांतरण प्रक्रिया बंद करण्याचे अंदाजे ३०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठरले होते.
गेल्या आठवड्यात पंचायत ग्रामसभेत,सर्व्हे नंबर ३८ व ७२ मधील (नवीन सर्व्हे नंबरमधील )प्रस्तावित विकासकामांना विरोध करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला होता.त्यात अन्य तीन ठराव बहुमताने मंजूर केले होते. गावचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व भावी पिढीचे भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थ आत्माजी नाईक, संतोष कोरकणकर यांनी केली होती. राज्यभरातून पाठिंबा असल्याने हरमलचा लढा राज्यभर पसरण्यास वेळ लागणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, नुकतीच एका वृत्तपत्रात वीस हजार चौरस मीटर जमीन रुपांतरण बाबत नोटीस प्रसिद्ध झाली व ग्रामस्थ अस्वस्थ झाले. नगरनियोजन खाते उघडपणे स्थानिकांच्या हिताला तिलांजली देत असून, १७ बी,१९ ए,कायद्याचा वापर करून जमिनी परप्रांतीयांच्या घशात घातल्या असून,केरळच्या वायनाड सारखी स्थिती हरमल मध्ये घडण्याची भीती वाटत असल्याने ग्रामस्थ चवताळले असून आगामी आठ-पंधरा दिवसांत ग्रामस्थांतर्फे महत्वपूर्ण निर्णय जाहीर होण्याची चिन्हे असल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.