Goa Eco Sensitive Zone: सांगे व केपे तालुक्यातील विविध गावांतील स्थानिक आपली गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याच्या मागणीवर ठाम आहेत. ग्रामीण भागात इको सेन्सिटिव्ह झोनबाबत जनजागृती करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे स्थानिकांचे मत आहे.
दोन दिवसांपूर्वी, दक्षिण गोव्यातील १२ ग्रामपंचायती पुढे आल्या आणि त्यांनी गोव्यातील क्षेत्रे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या पर्यावरणतज्ज्ञांच्या पथकासमोर त्यांची गावे यामधून वगळण्याची मागणी केली.
‘गोमन्तक’ने सांगे आणि केपे तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधींशी संवाद साधला असता बहुतेक ग्रामस्थांना इको सेन्सिटिव्ह झोन आणि त्याचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी माहिती नसल्याचे समोर आले.
याविषयावर गावकरी भीतीच्या व संशयाच्या शाळेत दिसत होते. गोव्यात केंद्र सरकारचे कोणतेही धोरण लागू करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही किंवा नवीन बदलांची माहिती दिली जात नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गोव्यातील इको सेन्सिटिव्ह झोनअंतर्गत काही गावे दाखविण्याबाबत अनेक स्थानिकांनी त्यांचे मत व्यक्त केले.
सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक आणि सावर्डेच्या पंच उन्नती वडर यांनीही सावर्डे पंचायत क्षेत्रातील स्थानिक बहुतांशी खाणकामांवर अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले. आता हे लोक शेतीकामात गुंतले आहेत. येथे काजूची लागवड व इतर वनस्पती आहेत.
आमचे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट केले गेले तर आम्ही भविष्यात खाणकाम व कोणताही विकास करू शकणार नाही. त्यामुळे खोला पंचायतीत झालेल्या बैठकीत सोमवारी आम्ही समाजकल्याणमंत्र्यांना याविषयी निवेदन दिले आहे.
अनेक स्थानिकांनी पर्यावरणतज्ज्ञांच्या पथकापुढे त्यांची गावे इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
काले हे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आल्यास आपण सध्या करतो तशी शेती व इतर कामे मुक्तपणे करू शकणार की नाही, याचीच आम्हाला चिंता वाटते. काही भागांना इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करून सरकारला काय फायदा होणार आहे, हे मला कळत नाही.
- गोकुळदास खुटकर, शेतकरी, काले
सांगे तालुक्यातील काही भाग आणि दुधाळ, काले, साकोर्डे ही काही गावे आधीच वनक्षेत्राखाली येत असून तेथील रहिवाशांना आधीच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून समावेश केल्यास गावकऱ्यांना या भागात काही कामे करण्यापासून अधिक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.
- अमर नाईक, वकील, कष्टी
आपल्या भावी पिढ्यांनी या गावात राहण्याची गरज आहे. आपण आपली घरे येथे बांधली पाहिजेत आणि आपल्या गावात काही विकास होतो का ते पाहिला पाहिजे. जर आपले गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आले तर आपल्यावर अनेक निर्बंध येतील, अशी भीती सर्वांनाच वाटते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.