धर्मांतर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सडये- शिवोली येथील डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हास याना त्यांच्या सडये येथील संस्थेच्या इमारतीत धार्मिक कृत्ये करण्यावर बंदी घातली असून त्यासंदर्भातचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
अजूनही हा वाद अधुनमधून उफाळत असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही उपस्थित होऊ शकतो अशी शिफारस पोलिसांनी केली होती. त्याच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यानी डॉम्निक व जोअन याना सडये शिवोली येथील त्यांच्या संस्थेत त्यांच्या भाविकांसाठी कोणतीही धार्मिक कृत्ये किंवा प्रार्थना आयोजित करण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
सडये पंचायत क्षेत्रातील ट्रोपा येथील अवरलेडी ऑफ परसेक्युटेड चर्च परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिलिव्हर पंथाच्या डॉम्निक मास्कारेन्हास तसेच गटाकडून प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दर रविवारी ट्रॉपा परिसरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येत असलेल्या बिलिव्हर पंथीयांच्या प्रार्थना सभांना हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित रहात असल्याने स्थानिक कॅथोलिक ख्रिस्ती समाज तसेच बिलिव्हर पंथीयांमध्ये अनेकदा खटके उडत होते. यासंदर्भात म्हापसा पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
बिलिव्हर पंथाशी संबंधित खोबरेकर कुटुंबीयांकडून पास्टर डॉम्निक मास्कारन्हेस, त्याची पत्नी जोहान व अन्य लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पास्टर डिसोझा याला त्याच्या सडये येथील राहत्या घरातून अटक केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.