म्हापसा : रेईश-मागूस या जिल्हा पंचायत मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काल गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी नामांकन भरले. त्यात भाजपतर्फे संदीप बांदोडकर तर काँग्रेसतर्फे प्रगती पेडणेकर यांचा समावेश आहे. उद्या शुक्रवारी अर्जांची छाननी होणार आहे. आतापर्यंत फक्त चौघांनी अर्ज भरलेले आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेसबरोबरच रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) साईनाथ कोरगावकर व अपक्ष उमेदवार राजेश दाभोळकर यांचा समावेश आहे. 16 ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे.
रेईश-मागूस मतदारसंघात एकूण 18,467 मतदार आहेत. तत्कालीन झेडपी सदस्य रुपेश नाईक यांच्या राजीनाम्यानंतर बार्देश तालुक्यातील रेईश-मागूश जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची वाटचाल चौरंगी असली तरी भाजपचे पारडे किंचित जड दिसत आहे. साळगावचे आमदार केदार नाईक यांनी भाजप उमेदवार संदीप बांदोडकर यांच्या विजयाचा विडा उचलला आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केदार नाईक हे साळगाव मतदारसंघातील विविध पंचायतींचे पंचसदस्य तसेच कार्यकर्त्यांना घेऊन बांदोडकरांसोबत हजर होते. आरजीचे उमेदवार साईनाथ कोरगावकर यांचाही प्रभाव या पोटनिवडणुकीत पडू शकतो.
(Goa District Panchayat By-Election)
राजेश दाभोळकरांना ‘आप’चा पाठिंबा
अपक्ष उमेदवार राजेश दाभोळकर यांना ‘आप’ने पाठिंबा जाहीर केला आहे. ‘आप’ने आपला उमेदवार न देता अपक्ष उमेदवाराच्या मागे राहण्याचा घेतलेला निर्णय किती यशस्वी ठरतोय हे निकालानंतर दिसून येईल. दाभोळकर यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले नशीब अजमावले आहे. परंतु ते अपयशी ठरले. आता ‘आप’ने त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने लढत रंगतदार ठरणार आहे.
भाजपतर्फे संदीप बांदोडकर यांनी रेईश-मागूस मतदारसंघातून उमेदवारी भरली आहे. नामांकन सादर करताना साळगावमधील अर्ध्यापेक्षा जास्त सरपंच व उपसरसरपंच आमच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे निकाल काय लागणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
- केदार नाईक, साळगावचे आमदार
काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये गेले असले तरी मतदार हे काँग्रेससोबतच आहेत. या राजकीय घडामोडींचा फटका रेईश-मागूस मतदारसंघाच्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत आम्हाला नक्कीच बसणार नाही. मतदार व कार्यकर्ते हे काँग्रेसच्या पाठीशी आहेत.
-वीरेंद्र शिरोडकर, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष
मतदार संख्या
एकूण मतदार : 18,467
महिला मतदार : 9338
पुरुष मतदार : 9129
मागे वळून पाहताना
28 जानेवारी 2022 रोजी रुपेश नाईक यांनी झेडपी सदस्यत्वाचा राजीनामा दिला व नंतर त्यांनी साळगाव विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत केदार नाईक यांनी बाजी मारली होती. त्यानंतर रुपेश नाईक यांनी पिळर्ण-मार्रा पंचायतीतून निवडणूक लढविली व ते पंचसदस्य म्हणून निवडूनही आले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर मागील आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ रेईश-मागूस झेडपी सदस्य पद हे रिक्त आहे.
दोघांचा पत्ता कट :
साळगाव भाजप मंडळाने अभिजीत बाणावलीकर व करण गोवेकर यांची नावे पक्षाला दिली होती. यातील बाणावलीकर हे माजी मंत्री जयेश साळगांवकर यांचे तर गोवेकर हे विद्यमान आमदार केदार नाईक यांचे जवळचे मानले जातात. अशावेळी, आपापसात वाद नको म्हणून भाजपने ‘तडजोडीचा उमेदवार’ म्हणून पक्षाचे तिकीट संदीप बांदोडकर यांना दिले आहे.
काही ठळक मुद्दे
साळगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान राजकीय घडामोडी व ‘आरजी’च्या उमेदवारामुळे झेडपी निवडणुकीत रंगत.
मतदारसंघातील अधिकतर पंचसदस्य हे सत्ताधारी भाजपच्या बाजूने. मात्र, या पक्षाचे अंतर्गत राजकारण कसे वळण घेते, यावर भविष्यातील समीकरणे अवलंबून.
माजी मंत्री दिलीप परुळेकर व जयेश साळगावकर यांच्यासोबत संवाद साधत विद्यमान आमदार केदार नाईक यांना रेईश-मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जिंकून आणावयाचा आहे. त्यामुळे केदार नाईक यांची कसोटी लागणार आहे.
तत्कालीन झेडपी सदस्य व विद्यमान पंच रुपेश नाईक यांची भूमिका महत्वाची असेल.
रेईश-मागूसमधील 18 हजार मतदारांपैकी सुमारे 65 टक्के मतदार भंडारी समाजाचे. या मतदारसंघात नेरुल, सांगोल्डा, पिळर्ण तसेच रेईश-मागूस या पंचायतींचा समावेश.
‘तडजोडीचा’ उमेदवार : संदीप बांदोडकर हे पिळर्ण पंचायतीचे चारवेळचे पंचसदस्य आहेत. त्यांनी सरपंचपदसुद्धा भूषविले आहे. आमदार केदार नाईक तसेच माजी मंत्री जयेश साळगावकर या दोघांतील राजकीय तडजोडीचा उमेदवार म्हणून बांदोडकर यांना पक्षाने ही उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. केदार नाईक यांच्यासाठी रेईश-मागूस पोटनिवडणूक ही परीक्षाच असेल. दुसऱ्या बाजूने काँग्रेसने प्रगती पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी झेडपी निवडणूक लढविली होती. त्या भंडारी समाज केंद्रीय समितीच्या उपाध्यक्षा आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.