Goa Dhavrukh Institute: कुणी तरी आपली दखल घ्यावी, यासाठी काम न करता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झटावे, या हेतूने आणि निव्वळ निसर्गप्रेमापोटी मांद्रे येथील ‘धवरुख’ संस्थेची स्थापना झाली. निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य करण्याचा विडा उचललेल्या या संस्थेने आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त झाडे लावली. शिवाय ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, हा उपक्रमही यशस्वीपणे राबवला. झाडे नुसतीच लावली नाहीत, तर ती जगवलीही!
या संस्थेने ठिकठिकाणी आयुर्वेदिक झाडांची लागवड केली आहे. भूजल संवर्धन करताना पावसाचे पाणी जमिनीत साठवून राहावे, यासाठी यशस्वी प्रयोग केले आहेत. शिवाय भूतदया दाखवण्याचे कार्यही ही संस्था करते.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आतापर्यंत संस्थेने ‘ट्री ऑफ होप’ या उपक्रमाला प्रारंभ केला. 35 झाडांपासून सुरू केलेल्या या उपक्रमात सुमारे 15 हजार झाडे लावली आहेत. विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, पर्यावरणप्रेमी तसेच ग्रामस्थ या सर्वांनी मिळून ‘ट्री ऑफ होप’ या उपक्रमाला सुरुवात केली. त्याचे शिल्पकार आहेत मांद्रेचे रूद्रेश म्हामल आणि त्यांची पर्यावरणप्रेमी टीम. त्यांच्या अथक प्रयत्नांतून फुललेला सुंदर निसर्ग आपल्याला जुनसवाडा-मांद्रेच्या माळरानावर पाहता येईल.
2016 साली हरमल येथील काही तरुणांनी या डोंगरावर वृक्ष लागवड केली होती. त्यात एक वटवृक्षही आहे. 2017 साली हे झाड अज्ञाताने कापले. तसेच 2018, 2019 मध्येही या झाडाचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा 2020 साली जोमाने वाढलेल्या या वृक्षाला पुन्हा अज्ञाताने आग लावून संपविण्याचा प्रयत्न केला. पण त्या इवल्याशा रोपाने हार मानली नाही व नव्या जोमाने त्याला पालवी फुटली. या वृक्षाचा आदर्श घेऊन न थकता पर्यावरणप्रेमींची फौज अविरतपणे कार्यरत आहे.
पर्यावरण जतनाचे कार्य ‘ट्री ऑफ होप’चे स्वयंसेवक अविश्रांतपणे करत आहेत. संस्थेच्या उपक्रमांना औपचारिक स्वरूप यावे, यासाठी संस्थेचे नाव ट्री ऑफ होप असे नामकरण केले. सरकार दरबारी नोंदणी 'धवरुख' या नावाने 27 जुलै 2021 साली केली आहे. 'धवरूख' या एका आयुर्वेदिक वृक्षाचे नाव संस्थेला दिले आहे. हे वृक्ष मोठ्या प्रमाणात मांद्रे परिसरामध्ये लावले आहेत, हे विशेष.
अशी होते वृक्षलागवड आणि देखभाल-
1. दर पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते. जैवविविधता मंडळ, वन खाते यांच्यातर्फे रोपटी उपलब्ध करून दिली जातात.
2. वृक्षारोपणानंतर झाडांच्या मुळांशी मातीची भर देणे, आधार देणे, पाणी अडवण्यासाठी लहान चर खणली जाते.
3. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी वेळ काढून ही मंडळी श्रमदान करतात.
4. जानेवारी ते पावसाळा सुरू होईपर्यंत विकत आणलेल्या टँकरचे पाणी दर रविवारी झाडांना घातले जाते. हे पाणी पाच लिटर क्षमतेच्या बाटली भरून झाडाला दिले जाते.
5. मे महिन्यात डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणी चर मारली जाते. यामुळे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवली जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.