Goa Cyber Crime: आधी ऑनलाईन फ्रेंडशिप केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून गोव्यातील एका मुलीची साडे आठ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल झाला आहे.
गोव्यातील या मुलीला एका फ्रॉड ऑनलाीन मॅट्रिमोनियल पोर्टलवरून कॉल आला. त्या कॉलवर तिचे सर्व तपशील घेतले गेले. त्यानंतर तिला लग्नासाठी चांगली स्थळे देण्याचे कबूल करण्यात आले. थोड्या दिवसांनी तिला वेगवेगळ्या मुलांच्या डिटेल्स येऊ लागल्या.
त्यातील एक प्रोफाईल तिला आवडले. त्यामुळे त्याचे काँटॅक्ट डिटेल्सही तिच्यासोबत शेअर केले गेले.
नंतर संबंधित मुलाचे परदेशी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर कॉल येऊ लागले. त्यातून त्यांची मैत्री जमली. आणि काही काळाने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या मुलाने तिच्याशी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. या मुलीनेही त्याला होकार दिला.
लग्नाची बोलणी करायला गोव्यात येतो असे त्याने सांगितले. गोव्यात येण्याची विमानाची तिकिटेही तिला व्हॉट्सअॅपला पाठवली. कधी येणार आहे, ते त्याने तिला कळवले. येताना संबंधित मुलीसाठी सोन्याचे दागिने आणि इतर महागडे सामान घेऊन येतो, असेही त्याने सांगितले.
त्यानंतर संबंधित मुलीला तो मुलगा विमानतळावर पोहचला असून कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्याला अडवले असून त्याच्याकडील साहित्य जप्त केल्याचा फोन केला. तसेच जर साहित्य हवे असेल तर कस्टम ड्युटी भरावी लागेल, असेही सांगितले.
त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून तिला कॉल करून तिच्याकडून अंदाजे 8.50 लाख रूपये घेतले. हे वेगवेगळे नंबर्स पोलिस अधिकाऱ्यांचे आहेत, असेही तिला भासवले. युपीआय ट्रान्सफर, नेट बँकिंग, कॅश डिपॉझिट या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले.
पण एवढे रूपये ट्रान्सफर करूनही तिला विविध मोबाईल नंबर्सवरून पैशांसाठी कॉल येत होते. तेव्हा तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. त्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली.
सध्या सायबर क्राईममध्ये याबाबत तक्रार देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विद्यानंद पवार पुढील तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.