गोव्यात सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा; 'या' असतील अटी
Goa Curfew: कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मार्चमध्ये टाळेबंदी लागू केल्यापासून राज्यात सिनेमागृहे बंद होती. सरकारने आज पुन्हा आठवडाभर राज्यव्यापी संचारबंदीत (Curfew) वाढ करताना सिनेमागृहांना (Theater) 50 टक्के बसण्याच्या क्षमतेने खुली करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे गेले काही महिने आतुरतेने प्रतीक्षेत असलेल्या सिनेमागृहांच्या मालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच सिनेरसिकांना चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा कर्फ्यू येत्या 30 ऑगस्टपर्यंत सकाळी 7 वा. पर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज्यव्यापी संचारबंदीमध्ये आठवडाभर वाढ करण्याचे सरकारचे सत्र मात्र गेले अडीच महिने सुरूच आहे. त्यामुळे हा कर्फ्यू यावेळी तरी सरकार उठविल अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. सिनेमागृहांना त्यातून सूट देताना कसिनो, ऑडिटोरियम, कम्युनिटी हॉल, रिव्हर क्रुझ, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क, स्पा व मसाज पार्लर, शाळा हे बंद ठेवण्यात आले आहे. व्यायामशाळा तसेच हॉटेल व बार हे 50 टक्के क्षमतेने यापूर्वीच सुरू करण्यास मुभा दिलेली आहे.
सिनेमागृहांसाठी ‘एसओपी’
प्रवेशद्वारावार सॅनिटायझरची सोय
सिनेरसिकाला मास्कची सक्ती
दोन खुर्च्यांमध्ये सुरक्षित अंतर
‘थर्मलगन’ने प्रत्येकाची तपासणी
सभागृहांचे चित्रपटानंतर सॅनिटायझेशन
50 टक्के प्रेक्षक क्षमतेने थिएटर उघडण्याची परवानगी दिली असली तरी इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काही दिवस लागतील. त्याचबरोबर सुरवातीलाच प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे मत अध्यक्ष चित्रपटगृह मालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.