पणजी : सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या गोष्टी राज्यात सध्या घडत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक (Goa Culture) प्रदूषण वाढत आहे. याचा परिणाम म्हणून समाजाचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. म्हणूनच सर्वसामान्यांनी या सांस्कृतिक प्रदूषणाविरोधात लढा उभारण्याची गरज आहे, असे आवाहन साहित्यिक ‘पद्मश्री’ विनायक खेडेकर यांनी केले.
येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या 150व्या स्थापनादिनानिमित्त आयाजित कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना खेडेकर बोलत होते. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ही स्थिती सावरण्यासाठी लोकांचा पुढाकार आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
धार्मिक कर्मकांडे कालसापेक्ष असतात असे नाही, पण त्याच्या आडून जातीभेदाच्या भिंती तयार होत आहेत. मला जाती-धर्माबाबत बोलायचे नसले तरी त्यावरून राजकीय रान पेटले आहे, त्याबाबत चिंता वाटते. साहित्य क्षेत्रातही सर्वकाही आलबेल आहे असे नाही. सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यास या गोष्टी कारणीभूत ठरताहेत. त्याविरोधात काम करण्याची गरज आहे, असे खेडेकर म्हणाले.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर, साहित्यिक गुरूदास नाईक, पुंडलिक नाईक, मारिया आवरोरा कुटो यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रुपये २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर संस्थेचे प्रधान सचिव दिगंबर काणकोणकर यांचीही उपस्थिती होती.
प्रत्येक विषय सरकारवर ढकलू नका : मुख्यमंत्री
राज्यात सांस्कृतिक प्रदूषण होत आहे हे मान्य आहे, पण त्याबाबत केवळ चिंता व्यक्त करून काही होणार नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर ढकलून चालणार नाही. त्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे. आम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्राला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व करीत आहोत. महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्यामागेही हाच उद्देश होता. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन त्यासाठीच सुरू केले आहे. केवळ राज्यातील युवकांनी आम्हाला साथ देत येथील संस्कृती आणि साहित्य जपण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.