सुमारे 3.9 दशलक्ष लोकसंख्या आणि केवळ 21,851 चौरस मैल क्षेत्रफळ असलेला क्रोएशिया आपल्या फुटबॉलच्या यशोगाथेमुळे चर्चेत आहे. कतारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोला पाठिंबा देणाऱ्या स्थानिक अरबांच्या नाकावर टिच्चून, मोरोक्कोला हरवत तृतीय स्थान मिळवले. क्रोएशियन लोकांनी केवळ फुटबॉलमध्येच प्रावीण्य मिळवले नाही तर क्रोएशियाच्या महिलांनी जागतिक सौंदर्य स्पर्धांमध्येही जगाला मंत्रमुग्ध केले आहे. मैदानात क्रोएशियाचे फुटबॉल खेळाडू चमकत होते आणि मैदानाबाहेर क्रोएशियन ब्यूटी क्वीन बनलेली मॉडेल इव्हाना नॉल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. माजी चॅम्पियन फ्रान्स विरुद्धचा त्यांचा सामना, तसेच ब्राझीलला पराभूत केलेला उपांत्यपूर्व फेरीतील सामना आणि नंतर तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कोवर विजय मिळवलेला सामना, या सर्व सामन्यांत क्रोएशियाच्या पाठीमागे खंबीरपणे गोव्यातील एक गाव होता व या गावाने त्यांचा प्रत्येक विजय जल्लोषात साजराही केला तो गाव म्हणजे कुंभारजुवे. आश्चर्य वाटले? त्यामागे तसाच इतिहासही आहे.
सेंट ब्लेझ किंवा पोर्तुगीज भाषेत साओ ब्रास यांना समर्पित असलेले चर्च कुंभारजुव्यातील गवंडाळी या गावात आहे. हे चर्च क्रोएशियात असलेल्या मूळ सेंट ब्लेझ (स्वेती व्लाहो) चर्चची प्रतिकृती आहे. ब्लेझ हे क्रोएशियातील दुब्रोव्हनिकचे रक्षणकर्ते व संत होते. जुन्या गोव्यापासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत गवंडाळी हे गाव वसले आहे.
मूलतः हे चर्च म्हणजे क्रोएशिअन खलाशी आणि व्यापारी यांनी जून 1541 मध्ये बांधलेले, साओ ब्रास यांना समर्पित एक छोटेसे चॅपल होते. गोव्यात ज्या पद्धतीने सेंट फ्रान्सिस झेवियरची यांची पूजा केली जाते, त्याच श्रद्धेने सेंट ब्लेझ यांचीही पूजा केली जाते.
अनेक शतकांपूर्वी डबरोव्हनिक शहर हे क्रोएशियातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कापड आणि मसाल्यांच्या शोधात असलेले हे व्यापारी 1530-1535 च्या दरम्यान कधीतरी गोव्यात आले. त्यांनी त्यांच्या रक्षणकर्त्यासंताच्या नावाने त्यांची स्वतःची वसाहत स्थापन केली.पोर्तुगीजांनी जहाजबांधणीसाठी म्हणून त्यांना गोव्यात आणले असावे, असाही एक प्रवाद आहे.
आजच्याप्रमाणेच त्याकाळीही डबरोव्हनिकचे लोक जगातील सर्वोत्तम जहाजबांधणी करणारे म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या रक्षणकर्त्या संताची करुणा भाकण्यासाठी एक छोटेसे चॅपल बांधले. 1563 मध्ये आर्चबिशप डी. फ्री अॅलेक्सिओ दी मिनेझीस (1595-1607) यांनी या चॅपलला चर्चचा दर्जा दिला. एफ. एक्स. गोम्स काताओ यांनी त्यांच्या कुंभारजुवे गावावरील पुस्तकात या गवंडाळीतील सेंट ब्लेझ चर्चचा उल्लेख केला आहे. ‘साओ ब्रास या समृद्ध वसाहतीची लोकसंख्या अंदाजे 12,000 होती. भाणस्तारी आणि गवंडाळी येथील सुमारे 772 हिंदूंनी 1559 पर्यंत बाप्तिस्मा घेतला. गुलामांनी गवंडाळीतील श्रीमंत महिलांना पालखीत बसवून चर्चमध्ये नेले होते.’, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
गवंडाळी किल्ला अस्तित्वात नाही. डब्रोव्हनिक बंदरावरील कमानीप्रमाणे या किल्ल्याचे सौंदर्यपूर्ण प्रवेशद्वार होते, अशी आठवणी अजूनही काही स्थानिकांच्या स्मरणात आहे. सुमारे 23 वर्षांपूर्वी साबांखाने गवंडाळी ते कुंभारजुवे फेरीकडे जाण्यासाठी रस्ता रुंद करताना ते पाडले. हे चर्चचे नदीकाठचे प्रवेशद्वार होते. क्रोएशियन लोकांनी डिझाइन केलेला आणि बांधलेला एक राजवाडा होता, जो आता अस्तित्वात नाही. 1570 च्या दशकातच क्रोएशियन आणि भारतीय यांच्यातील व्यापार कमी झाला. पोर्तुगालने मसाल्यांच्या व्यापारावरील आपली मक्तेदारी गमावली. बिटिश आणि डच यांचे वर्चस्व वाढू लागले होते. त्यामुळे गोवा हे व्यापारी बंदर म्हणून महत्त्वाचे राहिले नाही. काळाच्या ओघात व्यापार फारसा फायदेशीर नसल्यामुळे, स्थानिकांनी आपली वस्ती इतरत्र हलवली. या स्थलांतराचे आणखी एक तर्कसंगत कारण म्हणजे जुन्या गोव्याचा नाश करणारा प्लेग. या प्लेगपासून जीव वाचण्यासाठी गवंडाळीचे लोक नदी ओलांडून सांतिइस्तेव्ह आणि कुंभारजुवे बेटावर पळाले.
1667 साली एक मोठा भूकंप झाला ज्याने केवळ डबरोव्हनिक शहरच नव्हे तर त्यावरील समृद्धताही नष्ट केली. या भूकंपानंतर आर्थिक व लष्करी ताकद संपुष्टात आली. या भयंकर भूकंपानंतर डबरोव्हनिकमधील सेंट ब्लेझ चर्चची पुनर्बांधणी करण्यात आली. गोव्यातील चर्चमध्ये असलेली डबरोव्हनिकहून आणलेली घंटा अजूनही आपल्या स्मृती ठेवून आहे.
1999 साली क्रोएशियन इंडोलॉजिस्ट प्रो. झड्रावका मॅटिसिक (मूलत: डेब्रोव्हनिक शहरातील रहिवासी) यांना काही ऐतिहासिक नोंदी सापडल्या ज्यात गोव्यात स्थायिक झालेल्या डब्रोव्हनिक, कोटिया येथील लोकांबद्दल वर्णन होते. मॅटिसिक हा भारतातील संस्कृतचा अभ्यास करणाऱ्या विदुषी आहेत. त्यांनी गवंडाळीला जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा त्या या चर्चसमोर उभ्या राहिल्या तेव्हा, आपण जणू डबरोव्हनिकमधील चर्चसमोर उभ्या आहोत, असा त्यांना भास झाला. मॅटिस्टिक यांनी गोव्याच्या ऐतिहासिक अभिलेखागारात उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास केला. यात त्यांना गवंडाळी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे कलात्मक रेखाटन सापडले. आल्तिनो येथील बिशप्स पॅलेसच्या आर्काइव्हजमधून त्यांना या चर्चचे नेमके स्थान कळले. या क्रोएशियन विदूषीने केलेल्या संशोधनामुळेच क्रोएशिया प्रजासत्ताकचे 15 सदस्यीय संसदीय शिष्टमंडळ दि. 1 एप्रिल 1999 रोजी क्रोएशिया प्रजासत्ताकचे राजदूत झोरान अँड्रिक यांच्यासमवेत गवंडाळी येथे भेट देण्यास प्रवृत्त झाले. राजदूत म्हणाले की, ‘आम्हाला गवंडाळी येथे भेट देऊन अपूर्व आनंद झाला. सेंट ब्लेझ चर्च हे आमच्या पूर्वजांनी डबरोव्हनिक येथील बांधले होते. गोव्यातील हे चर्च डब्रोव्हनिकमधील तीनपट मोठ्या असलेल्या चर्चची प्रतिकृती आहे आणि वेदीही तशीच आहे.’ चार शतकांहून अधिक जुने नाते उलगडण्याचा आणि भूतकाळाशी स्वतःचे भावनिक नाते पुन्हा जोडण्याचा हा त्यांच्या प्रयत्न होता. चर्चच्या परगण्यात गवंडाळी आणि दौजी या गावांचा समावेश आहे, ज्यातील एक भाग तिसवाडीत आहे आणि काही भाग कुंबरजुवे बेटावर आहे.
क्रोएशिया प्रजासत्ताकाच्या दूतावासाचे मंत्री, सिल्विजा लुक्स-कालोगेरा यांनी सांगितले की, ‘तिथे रिकामी असलेली जागा अधिक महत्त्वाची आहे, जिथे 400 वर्षांपूर्वी क्रोएशियन लोकांनी बांधकाम केले होते. चर्चच्या भिंतीच्या डाव्या बाजूची रचना पाहता असे लक्षात येते की, अशी वास्तुकला गोव्यात अस्तित्वात नव्हती आणि ती कमी-अधिक प्रमाणात डब्रोव्हनिकमधील त्याच संताला समर्पित चर्चची प्रतिकृती आहे.’ गवंडाळी आणि कुंभारजुवे येथील लोक दि. 3 फेब्रुवारी रोजी दुब्रोव्हनिकच्या लोकांप्रमाणेच सेंट ब्लेझचा उत्सव साजरा करतात.
प्रत्येक वेळी जेव्हा एखादे क्रोएशियन जहाज मुरगाव बंदराला लागते, तेव्हा खलाशांचे क्रोएशियन शिष्टमंडळ या चर्चला भेट देते. एक क्रोएशियन बालरोगतज्ञ, डॉ. मार्जा रॅडोनिक, ज्यांनी एका दशकापूर्वी या चर्चला भेट दिली होती आणि त्यांनी या चर्चचा जीर्णोद्धार करण्यासाठी देणग्या गोळा केल्या. त्यांनी आजपर्यंत या चर्चची जीर्णोद्धार करण्यापूर्वीची आणि नंतरची छायाचित्रे जतन केली आहेत. डबरोव्हनिकमधील आर्ट गॅलरीचे मालक टी बॅटनिक यांनी भेटीनंतर त्यांची चित्रे चर्चला दान केली. त्यांचा लिलाव करण्यात आला आणि त्यातून मिळणारे पैसे चर्चच्या दुरुस्तीसाठी वापरले गेले. गेल्या वर्षी एचआरटी क्रोएशियन रेडिओ-टेलिव्हिजनचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ, पर्यटन विभागाच्या निमंत्रणावरून गोव्यात या युरोपीय राष्ट्र आणि गोवा यांच्यातील पूर्वीच्या संबंधांवर एक माहितीपट चित्रित करण्यासाठी आले होते.
इतिहासाचा कधी वापर होतो, तर कधी गैरवापर. जगातील दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये असलेले 400 वर्षांपासूनचे ऋणानुबंध क्रोएशियामधील डब्रोव्हनिक आणि गोव्यातील गवंडाळी गावांना घट्ट बांधून ठेवतात. या ऐतिहासिक एकात्मतेचा जागर फुटबॉलसारख्या खेळाच्या माध्यमातून का होईना, होतोय हे महत्त्वाचे. जगभरात अशा बनवलेल्या चर्चच्या प्रतिकृती हे संपूर्ण जग एकमेकांशी जोडणारे सांस्कृतिक दुवे आहेत. आम्हांला सामाजिक शांतता बिघडवणारा, एकमेकांच्या विरोधात उभे करणारा इतिहास नको. सामाजिक शांतता निर्माण करणारा, एकात्मता निर्माण करणारा इतिहास हवाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.