भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षांहून अधिककाळ राज्यं केलं, तर गोव्यात 450 वर्षांहून अधिककाळ पोर्तुगीज तळ ठोकून होते. दिर्घकाळ चालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी यश आले. ब्रिटिश भारत सोडून गेले आणि भारत स्वातंत्र्य झाला. जाता जाता त्यांनी देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. असे असले तरी भारताचा एक महत्वाचा भाग अजूनही पराकीय जुलमी राजवटीखाली होता. तो म्हणजे गोवा.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तसेच महात्मा गांधी यांनी गोव्याच्या मुक्तीसंग्रामाला बळ देण्याचे काम केले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्याची किंमत कळावी त्यांनी स्वत: या लढ्यात उतरून स्वातंत्र्य मिळवावे अशी भूमिका पंडीत नेहरू यांची होती.
भारत स्वतंत्र झाला तरी त्यानंतर गोव्याला 14 वर्षे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागला. या लढ्यालाच गोवा मुक्तीसंग्राम म्हटले जाते. डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्याच्या मुक्तीसंग्रामचे प्रणेते म्हटले जाते. 10 जून 1946 रोजी असोळणा येथील त्यांचे मित्र डॉक्टर ज्युलियांव मिनेझिस यांच्या भेटीसाठी डॉ. राम मनोहर लोहिया गोव्यात आले. पोर्तुगीज दडपशाही विरोधात उठाव करण्याचा निर्णय लोहिया यांनी घेतला. त्यानंतर झाली ती मडगावची ऐतिहासिक सभा.
18 जून 1946 रोजी डॉ. लोहिया यांच्या सभेला हाजारो नागरिक गोळा झाले होते. लोहिया भाषणाला सुरूवात करणार एवढ्यात त्यांना पोर्तुगीज पोलिसांनी भाषण करण्यापासून रोखलं आणि एका गाडीत डांबून नेले. लोहिया यांचे भाषण झाले नाही पण, या सभेनंतर लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग जागे झाले. लोहियांच्या अटकेनंतर गोमंतकीय जनता पेटून उठली. पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होऊ लागला. जून 1961 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झाला. अखेर भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी 'ऑपरेशन विजय' करून 19 जून 1961 रोजी गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त केले.
गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणखी एक महत्वाचे नेते म्हणजे पुरूषोत्तम काकोडकर. पुरूषोत्तम काकोडकर आणि पंतप्रधान नेहरू यांचे जवळचे संबंध होते. नेहरूजींना गोव्याची माहिती काकोडकर यांच्या मार्फत मिळत होती. गोवा मुक्त झाल्यानंतर तो एक वेगळा प्रदेश म्हणून पुढे आला होता. तर त्याला राष्ट्र म्हणून देखील दर्जा देता येऊ शकतो असा एक विचार त्यावेळी समोर आला होता.
'गोमन्तक'चे संचालक आणि संपादक राजू नायक यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, "गोवा स्वातंत्र्य झाल्यानंतर ते वेगळं राष्ट्र बनू शकते असा एक विचार पुढे आला. जगात अनेक असे छोटे देश आहेत. जे केवळ पर्यटन किंवा खाण उद्योगावर चालतात. तेव्हा गोवा देखील एक वेगळा देश म्हणून उदयाला येऊ शकतो असा विचार पुढे आला. त्यानंतर गोव्यातून काही स्वातंत्र्यसैनिक पोर्तुगालचा राष्ट्रप्रमुख अँटोनियो डी ऑलिव्हेरा सालाझार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही. आणि हा मुद्दा मागे पडला."
"गोवा वेगळा देश झाला नाही हे एका अर्थाने योग्य झाले, नाहीतर चार-पाच धनिकांच्या हातात हे राज्य गेलं असतं आणि अमेरिका सारख्या राष्ट्राने येथे आपले तळ ठोकले असते. त्यामुळे गोव्याने भारतासोबत जाऊन योग्य निर्णय घेतला. यामुळे भारताच्या सर्व लोकशाही मूल्यांचा फायदा गोव्याला झाला." असे राजू नायक म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.