

पणजी: राज्यभरातील उच्च माध्यमिक विद्यालयातील कंत्राटी व तासिका तत्त्वावरील शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी आझाद मैदानावर निदर्शने केली.
या शिक्षकांचा प्रश्न २२ ऑक्टोबरपर्यंत सरकारने सोडविला नाही, तर २३ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ॲड. अजय प्रभुगावकर यांनी दिला आहे. आझाद मैदानात कंत्राटी शिक्षकांनी एकत्रित येऊन आंदोलन केले. त्यावेळी प्रभुगावकर बोलत होते. याप्रसंगी जॉन नझारेथ यांची उपस्थिती होती.
ॲड. प्रभुगावकर म्हणाले, पदव्युत्तर आणि बी.एड. अशी पात्रता असूनही गेल्या १०-१५ वर्षांपासून सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘लेक्चर-बेसिस’वर (तासिका तत्त्वावर) काम करणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यासाठी विशेष योजना सुरू करावी, अशी आमची मागणी आहे. हे शिक्षक २००९ पासून नियमित अध्यापनाचे काम करत आहेत; परंतु योग्य भरती किंवा सेवेत कायम करण्याबाबतचे धोरण नसल्यामुळे त्यांच्या करिअरबाबत अनिश्चितता कायम आहे.
माध्यमिक शाळांतील शिक्षकांना उच्च माध्यमिक शाळांमध्ये पदोन्नती दिल्याने राज्यातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. शाळेच्या नियमित वेळेत काम करूनही या कंत्राटी शिक्षकांना प्रतितासिका केवळ १०० रुपये मिळतात आणि त्यांचे मासिक उत्पन्न साधारणपणे १६,००० रुपये इतकेच असते. या शिक्षकांचे करिअर सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन ॲड. प्रभुगावकर यांनी केले.
‘त्या’ कामगारांबाबत स्पष्टतेचा अभाव
दहा वर्षांहून अधिक काळ कंत्राटी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचे स्वागत आहे. मात्र, त्यात ‘पीडब्ल्यूडी’ कामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टता नसल्याने त्यांच्यावर पुन्हा अन्याय होण्याची भीती आहे.
‘पीडब्ल्यूडी’ कामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी १४ एप्रिलपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा निर्णय घेतला. मात्र, ज्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी आंदोलन उभारले, त्यांच्याच नियमितीकरणाबाबत नव्या अधिसूचनेत स्पष्ट उल्लेख नसल्याकडे ॲड. अजय प्रभुगावकर यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.