
म्हापसा: शहरात दोन कदंब बसस्थानके आहेत. मात्र, त्यांची दुरुस्ती आणि दर्जा राखण्यात विद्यमान आमदार कमी पडले आहेत. याची कबुली त्यांनी स्वतः पावसाळी विधानसभा अधिवेशनात दिली, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केली.
भिके यांनी म्हापसा बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यावर ठिय्या मारून येथील खड्ड्यांसह दर्जाहीन बसस्थानकाच्या एकंदर परिस्थितीवरून सरकार तसेच आमदारांचा निषेध नोंदविला.
शनिवार, २ ऑगस्ट रोजी, दुपारी म्हापसा कदंब बसस्थानकाच्या आवरात आयोजित पत्रकार परिषदेत भिके बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, गटाध्यक्ष मीताली गडेकर व परेश पानकर हे उपस्थित होते.
म्हापशाचे आमदारच विधानसभेत सुसज्ज म्हापसा बसस्थानकाची मागणी प्रलंबित असल्याचे बोलत आहेत. यापूर्वी त्यांनी म्हापशात पंचतारांकित बसस्थानक उभारणार असल्याचे सांगितले होते आता हेच का ते खड्डेमय झालेले ते पंचतारांकित बसस्थानक? असा सवाल विजय भिके यांनी उपस्थित केला.