फसलेल्या बंडात काँग्रेस नेस्तनाबूत होण्याची बिजे

काँग्रेस पक्षातील बंड जरी फिसकटले असले तरी गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावरील प्रश्‍नचिन्ह दूर होणे कठीण आहे.
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak

राजू नायक

पणजी : काँग्रेस पक्षातील बंड जरी फिसकटले असले तरी गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावरील प्रश्‍नचिन्ह दूर होणे कठीण आहे. यापुढे काँग्रेस कधी 11 चीही संख्या गाठू शकणार नाही, इतकेच नव्हे तर अल्पसंख्याकांच्या मनातून हा पक्ष कायमचा उतरेल, अशीच भीती आहे. या परिस्थितीचा फायदा आम आदमी पक्षाला होऊ शकतो. त्या पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात एव्हाना आनंदोत्सवही सुरू झाला आहे.

काँग्रेसमधील बंड फिसकटण्याचे प्रमुख कारण दिगंबर कामत यांनी फारसे नियोजन न करता घेतलेली उडी. दिल्लीत त्यांनी कोणाच्या जोरावर आपण विधिमंडळ पक्षात फूट घालू शकतो, असे सांगून भाजप पक्षश्रेष्ठींचे मन वळवले, हे कळण्यास मार्ग नाही. कारण तोपर्यंत कामत यांच्या गटात स्वतः ते वगळतां एकही सदस्य नव्हता. दिल्लीहून ‘गो अहेड’ मिळताच कामत यांनी तयारीत राहा, असा संदेश स्थानिक आमदाराला पाठवला, तेव्हा ही बातमी बाहेर फुटली. त्यावेळी कामत यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही ते काय उचापती करतात, याचा पत्ता नव्हता.

काँग्रेसमध्येच नव्हे तर भाजपतही स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये फूट पडत असल्याचा कोणाला पत्ता नव्हता, याचे कारण पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील नेतृत्वालाही विश्‍वासात घेतले नाही. असाच प्रकार पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना पक्षात घेताना किंवा मंत्रिमंडळाचे खातेवाटप करताना घडला होता. भाजप पक्षश्रेष्ठी सध्या गोव्याच्या पक्षसंघटनेबद्दल स्थानिकांना काळोखात ठेवूनच दिल्लीहून निर्णय घेऊ लागले आहेत.

मंत्री विश्‍वजीत राणे यांची अस्वस्थता

दुसऱ्या बाजूला दिगंबर कामत यांना पक्षात घेण्याचे ठरत असताना सध्याचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रबळ मंत्री विश्‍वजीत राणे कमालीचे अस्वस्थ बनले. कामत यांना भाजपात घेतल्याने आपले स्थान कमकुवत होईल, अशी त्यांना भीती आहे. वास्तविक, कामत हे ना प्रमोद सावंत गटाचे, ना सतीश धोंड यांना निकटचे. कामत यांना पक्षश्रेष्ठींनी केवळ सरकारात सामावून घेतो, असा शब्द दिला होता. मंत्री-खात्याचा कोणताही वायदा नव्हता. परंतु कामत यांचे निकटवर्तीय म्हणू लागले, त्यांना नगरनियोजन खाते दिले जाऊ शकते- जे कामत यांनी पर्रीकर मंत्रिमंडळात सांभाळले होते. सध्याचे हे खाते राणे यांच्याकडे असल्याने त्यांचे वजन कमी होऊ शकते, असा समज निर्माण झाला. वास्तविक, कामत यांनीही संपूर्ण प्रकाराची भाजपातील एकाही स्थानिक नेत्याला कल्पना दिलेली नव्हती.

लोबो यांचेही घोडे गंगेत न्हाणार होते

मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर कामत व त्यांच्या संबंधांत वितुष्ट निर्माण झाले होते. परंतु कामत यांना हिरवा कंदील मिळताच लोबो यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. लोबो मागचे दोन महिने कोणत्याही अटींविना भाजप प्रवेशासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहेत. विश्‍वजीत राणे यांच्या कचाट्यातून मोकळे होणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. लोबो यांच्या गटात सध्या पत्नी डिलायला लोबो व केदार नाईक आहेत, शिवाय हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांचाही त्यांच्याशी निकट संबंध आहे. दोन महिन्यांपासून लोबो आपण आठ जणांना घेऊन भाजपात येऊ शकतो, असे फिलर्स दिल्लीला पाठवत आहेत. परंतु कामत यांच्यामागे एकाही आमदाराचे बळ नसले तरी त्यांच्या दिल्लीतील वजनामुळे लोबो यांचेही घोडे गंगेत न्हाणार होते. वास्तविक, दिगंबर कामत यांचे दिल्लीपेक्षा गुजरात कनेक्शन अधिक आहे. गुजरातच्या स्थानिक नेत्यांसह आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा व स्विमिंग फेडरेशनच्या काही भाजपनिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी दिल्लींत वशिला लावला.

Goa Congress
गोव्यात काँग्रेस अजूनही संभ्रमावस्थेत

कामत यांच्या पाठीमागे खनिज निर्यातदार

दिगंबर कामत यांना निकट असलेले मडगावचे एक खनिज निर्यातदार त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत. त्यांनीच गेल्या निवडणुकीत कामत हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे अनधिकृतरीत्या जाहीर केले होते. खनिज व्यवहार सांभाळणारा त्यांचा पुत्र गेले दोन दिवस कामत यांच्यासाठी आमदारांशी संपर्क साधत होता. तसा आरोप दिनेश गुंडू राव व गिरीश चोडणकर यांनी जाहीररीत्या केला आहे. कामत यांना मुख्यमंत्रिपद नसले तरी सरकारात महत्त्वाचे स्थान मिळावे, यासाठी गोव्यातील काही खनिज निर्यातदार देव पाण्यात घालून बसले आहेत, यात तथ्य आहे. आता लवकरच होऊ घातलेल्या खनिज लिजांच्या लिलावात सरकारकडून आपली पाठराखण व्हावी, यासाठी त्यांच्या हालचाली चालू असून, त्यासाठी दिगंबर कामत त्यांना मोक्याच्या ठिकाणी हवे आहेत. परंतु लीज लिलावामध्ये आता गृहमंत्री अमित शहा स्वत: लक्ष घालत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निधी उभारण्याच्या दृष्टीने केंद्रीय नेतेच हा व्यवहार सांभाळतील, असे संकेत मिळतात.

भाजप आमदारांचा काँग्रेसला विरोध

दिगंबर कामत यांना काँग्रेसच्या सात सदस्यांची जमवाजमव करण्यात आलेल्या अपयशामागे सरकारमधील काही वजनदार मंत्र्यांनी दिलेला काटशह हेही कारण आहे. विश्‍वजीत राणे, रोहन खंवटे व बाबूश मोन्सेरात या तिघांनी काँग्रेसमधील आमदारांच्या पक्षप्रेवशाला तीव्र विरोध केला. सूत्रांच्या मते, या तिघांनीही काँग्रेस आमदारांशी संपर्क साधून पक्षांतरविरोधी कायद्याचे भंय त्यांना दाखवले असल्याची माहिती मिळाली. ‘‘दिगंबर कामत स्वत:चा स्वार्थ साधून तुमचा केवळ वापर करतील, शिवाय तुम्ही आमदार म्हणून अपात्र व्हाल’’, असा इशारा हे नेते काँग्रेस बंडखोरांना देत होते, अशी माहिती एका काँग्रेस आमदाराने गोमन्तकशी बोलताना दिली. भाजपच्या एका नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला.

कामत यांच्यावर काँग्रेस पहिल्यापासून नाराज

कामत यांनीही गेले 100 दिवस गोव्यात भाजप सरकार आल्यापासून काँग्रेस सदस्यांशी फारसा संपर्क ठेवलेला नाही. विरोधी नेते मायकल लोबो व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या खाद्यांवर पक्षकारभार सोडून ते नाराजीचे सोंग वठवत होते. आमदारांच्या संपर्कात राहून त्यांना वश करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. त्यासाठी कामत यांनी नेहमीच मागे राहणे पसंत केले, अशी प्रतिक्रिया एका सदस्याने दिली. कामत यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला, त्यामुळे ते नाराज आहेत, हा समजही चुकीचा आहे. आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलेच होते, शिवाय 2022 मध्येही ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. मात्र आपल्याशिवाय एकही आमदार जिंकून आणण्यात त्यांनी कष्ट घेतलेले नाहीत. वरून काँग्रेसला त्यांनी दगा दिला, अशी प्रतिक्रिया गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली.

‘यह बुढे हो गए है!’

दिल्लीतील भाजपा नेत्यांनी ‘गो अहेड’चा इशारा देताच दिगंबर कामत यांची आमदारांशी संपर्क साधण्याची खटपट सुरू झाली. परंतु या काळात त्यांच्याबरोबर पक्षाचा एकही विश्‍वासार्ह नेता किंवा कार्यकर्ता नव्हता. पिंकी लवंदे हा त्यांचा नातेवाईक काही आमदारांच्या भेटीगाठी घेत होता. या प्रकारामुळे भाजप पक्षश्रेष्ठींचे दूत बनून गोव्यात आलेले निरीक्षक भूपेंद्र यादव नाराज झाले. ते बराच काळ रविवारी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर बसून होते. नंतर ते आपल्या हॉटेलमध्ये निघून गेले व संध्याकाळी दिल्लीला परतले. ‘यह बुढे हो गए है’, अशी त्यांची कामत याना उद्देशून शेवटची प्रतिक्रिया होती, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली.

Goa Congress
'काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलोय; अजूनही काँग्रेससोबतच'

फुटीचे सुरुंग काँग्रेसमध्ये धुमसत राहणार

बंड फिसकटले तरी काँग्रेसच्या अस्तित्वावर पडलेला डाग सहजासहजी पुसला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्यातील अनेक राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली. आता काँग्रेस दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाई करू पाहत असला तरी त्यातून काही निपजणार नाही. त्यांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आहे आणि त्यासाठी किती अवधी लागू शकतो, यासंदर्भात कायद्यात कोणतीही तरतूद नाही. सध्या न्यायालयातही अशा प्रकरणांवर वेगाने निर्णय होत नाही. शिवाय कामत व लोबो यांनी खरोखरच काँग्रेसमध्ये बंड करण्यासाठी काय हालचाली केल्या, याचा पुरावाही काँग्रेसकडे नाही. तशी कोणतीही भूमिका जाहीररीत्या त्यांनी घेतलेली नाही. हे दोघेही काँग्रेसमध्ये परत येण्याची शक्यता कमीच असल्याने पुढच्या काही काळात काँग्रेसमधील आमदारांची अस्वस्थता वाढवण्याचे काम ते करू शकतात. त्यामुळे आजचे बंड उद्या अस्तित्वात येणार नाही, असे सांगणे कठीण आहे. या फुटीचे सुरुंग काँग्रेसमध्ये यापुढेही धुमसत राहतील, असे संकेत मिळतात.

काँग्रेसचा मुलाधारच नष्ट होण्याच्या मार्गावर

काँग्रेस पक्षाची झालेली अप्रतिष्ठा भाजपला हवीच आहे. सध्या भाजप सरकारमागे 25 जणांचा गट भक्कमपणे उभा असला तरी काँग्रेसला गोव्यातून नेस्तनाबूद करण्यासाठीच 8 जणांच्या असंतुष्ट गटाला ते पक्षात घ्यायला तयार झाले होते. लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात भाजपला आपला उमेदवार आता जिंकून आणणे शक्य होणार आहे. शिवाय मायकल लोबोंच्या भूमिकेमुळे उत्तर गोव्यातून काँग्रेस पक्ष जवळजवळ उखडला गेला आहे. अल्पसंख्याक या पक्षापासून दूर झाले तर काँग्रेसचा मूलाधारच नष्ट होणार आहे. याचा फायदा आम आदमी पक्ष घेऊ पाहत आहे. 1994-99 या काळात भाजपचे 4 तर मगोपचे 12 आमदार होते. भाजपचे सदस्य अविचल राहिले व मगोपचे विघटन होत गेले व 1999 च्या निवडणुकीत भाजपचे 10 सदस्य निवडून आले व मगोपची सदस्यसंख्या 4 वर गेली होती. पुढच्या निवडणुकीनंतर काँग्रेस व आम आदमी पक्षाचे तुलनात्मक बलाबल असेच काहीसे दिसले, तर आश्‍चर्य वाटायला नको.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com