पणजी: राज्यातील कदंब बससेवा सुरू झाली तरी ग्रामीण भागापर्यंत प्रवास करणाऱ्या खासगी बसगाड्या सुरू न झाल्याने लोकांचे अतोनात हाल होत आहेत. राज्यात असलेल्या सुमारे १४०० खासगी प्रवासी बसगाड्यांपैकी १०० पेक्षा कमी बसेस सध्या धावत आहेत. आवश्यक प्रवासी मिळेनासे झाल्याने व बस मालकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ही बससेवा सुरू करणे सद्यस्थितीत शक्य नाही.
अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीम ताम्हणकर यांनी खासगी बससेवा सुरू करण्यासंदर्भात बोलताना म्हणाले, की सरकारने मे महिन्यात खासगी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली तेव्हा सुरुवातीला दोनशे बसेस सुरू झाल्या होत्या मात्र डिझेल किंमतीत झालेली वाढ तसेच कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण यामुळे सुरू असलेल्या बसेस कमी होत गेल्या. आता काही मार्गावर दोन बस धावत असल्या तरी त्याही नुकसानीत आहेत. काही बस मालक स्वतः चालक बनत आहे व तिकिट आकारत आहे. कदंब बससेवा ही राष्ट्रीय मार्गावर धावत असल्याने त्या ग्रामीण भागातील लोकांना काहीच फायदा होत नाही. ग्रामीण भागामध्ये खासगी बसेस धावत असत त्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे होत होते. आता लोकांना कदंब बसेसने प्रवास करूनही गावात चालत जावे लागते. प्रवाशांची संख्या कमी असल्याने खासगी बसेस सुरू करून दिवसाचा खर्चही निघत नाही त्यामुळे कोणीही खासगी प्रवासी बस मालक त्या सुरू करण्यास धाडस करत नाही. सरकारकडून खासगी बस मालकांना कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर काहीच मदत नसल्याने अनेकांची स्थिती बिकट झाली आहे.
खासगी बस मालकांना वाहतूक खात्याकडून २०१७ पासून अनुदान मिळणे बाकी होते. काही दिवसांपूर्वी सरकारने २०१७ ते जून २०१८ या काळातील अनुदान सुमारे ८०० बस मालकांना दिल्याचे पत्र दिले आहे अजूनही हे अनुदान बस मालकांच्या खात्यावर अजूनही जमा झालेले नाही. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी ही पत्रे गणेशचतुर्थीपूर्वी दिली मात्र त्यावर सही नव्हती. वाहतूक खात्याने हल्लीच नवी पत्रे दिली मात्र रक्कम अजूनही जमा झाली नाही. जर आवश्यक प्रमाणात प्रवासी मिळाल्यास खासगी बस प्रवासी मालक संघटना राज्यात बससेवा सुरू करण्यास तयार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास कोरोनाच्या संसर्गामुळे लोक बससेवेने प्रवास करण्यास घाबरत आहेत. बसमध्ये अर्ध्याहून कमी प्रवासी घेऊन व्यवसाय करणे शक्य नाही. अनेकजण शहरातील बसस्थानकापर्यंत
स्वतःची दुचाकी वाहने घेऊन येऊन त्यानंतर कदंबने प्रवास करतात. तर काहीजण दुचाकी व चारचाकी घेऊन कामाला जात आहेत. अनेक कारखान्यातील कामगार टाळेबंदीच्या काळात मूळ गावी परतले आहेत. शाळा व महाविद्यालये बंद आहेत. सरकारी कार्यालये तसेच काही खासगी आस्थापनात पूर्णपणे कामगारांची उपस्थिती नसते. अशा स्थितीत जोपर्यंत राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती कमी होत नाही तोपर्यंत राज्यातील खासगी प्रवासी बससेवा सुरू होण्याची शक्यता अंधूक आहे असे ताम्हणकर यांनी सांगितले.
खासगी बससेवा सुरू न करण्यामागील कारणे
संपादन: ओंकार जोशी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.