Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

Khari Kujbuj Political Satire: आम आदमी पक्षाने सांताक्रूझमध्ये उमेदवार आत्तापर्यंत दिला नाही. त्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने नेमकेपणाने बोट ठेवले आहे
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

युतीचा ‘चॅप्टर’ कोणी ‘क्लोज’ केला?

विरोधी विचारसरणी मानणारे लोक एकत्र येणे तसे कठीणच. गोव्याच्या हिताचा दावा करून ‘गोवा’ अर्थात ‘ग्रँड ऑपोजीशन अलायन्स’ ही युती करून भाजपाला टक्कर देण्याची विरोधकांची योजना अस्तित्वात येण्यापूर्वीच फसली. आता युती न होण्यास कोण जबाबदार? यावरून वाद सुरू झाला आहे. आरजीचे नेते युती न होण्यास काँग्रेसला जबाबदार धरतात तर गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाचे नेते आरजीला दोष देतात. युतीचा ‘चॅप्टर क्लोज’ दिल्लीत झाल्याचा दावा गोवा फॉरवर्डने केला आहे. आरजीचे नेते विमानाने दिल्लीत युतीचा ‘चॅप्टर क्लोज’ करण्यासाठी गेले होते का? स्थानिक प्रादेशिक पक्षाचा ‘हायकमांड’ दिल्लीत आहे का? काही का असेना युती झाली नाही, म्हणून भाजप नेते खुश असणार हे मात्र निश्चित.

पालेकरांची छुपी युती?

आम आदमी पक्षाने सांताक्रूझमध्ये उमेदवार आत्तापर्यंत दिला नाही. त्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने नेमकेपणाने बोट ठेवले आहे. शुभम पार्सेकर याने ‘एक्स''द्वारे अमित पालेकर यांनी आपल्या मतदारसंघात उमेदवार उभा केला नाही, यावरून त्यांनी काँग्रेसबरोबर पडद्यामागून करार केला का? असा सवाल केला आहे. ‘आप’च्यावतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाआधीही म्हणजे (सोमवारी) दोन उमेदवार जाहीर केलेत. कदाचित अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही ते उमेदवार घोषित करून त्यांचा अर्ज भरतील. पार्सेकर यांनी एक दिवस अजून वाट पहायला हवी होती, त्यानंतर पालेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला असता तर बरा झाला असता. आता कदाचित ‘आप’वाले गडबडीत मंगळवारी सकाळी तेथील उमेदवार जाहीर करू नयेत, म्हणजे मिळवले.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: सरकारविरोधी मतदार वगळण्यासाठी 'एसआयआर'चा वापर, एल्विस गोम्स यांची टीका

नोनू नाईकांची ‘झाकली मूठ’?

नोनू नाईक म्हणजे प्रियोळ मतदार संघाचे गेल्या विधानसभा निवडणुकीतील ‘आप’ चे उमेदवार. यावेळी ते बेतकी - खांडोळा या ''प्रियोळा''त येणाऱ्या झेडपी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करताना दिसत होते. पण त्यांनी अनपेक्षितरित्या या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील भोमकर यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे स्पर्धेत उतरण्यापूर्वीच माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ चाच प्रकार आहे का, अन्य काही प्रकार आहे. हे कळायला मार्ग नसला तरी तशी या भागात चर्चा सुरू आहे एवढे खरे. तसे पाहायला गेल्यास गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त २४५ मते मिळाल्यामुळे नोनूंची मूठ ‘सव्वा लाखाची’ नव्हती हे कधीच सिद्ध झाले आहे. मग ती झाकून आणि कसला फायदा होणार? हे आम्ही नाही बोलत हो बेतकी-खांडोळा भागातील लोकच असे बोलताहेत. आता बोला!

पोलिसांवर हा उद्रेक कशासाठी ?

‘कोणी यावे टपली मारून जावे’ अशी मराठीत एक म्हण आहे. आपल्या पोलिसांच्या बाबतीत तेच होते. गुन्हा कोणीही करो,चूक कुणाचीही असो, लोक शिव्या घालतात पोलिसांना. परवाच्या हडफडेतील अग्नितांडवाच्या चौकशीसाठी पोलिसांनी स्थानिक सरपंचाला पोलिस ठाण्यात बोलावल्याचे कारण सांगून सरपंच समर्थकांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेला व पोलिसांच्या हुर्यो उडविल्या. काणकोणात निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर राजकीय नेते ओरडले. जिल्हा पंचायत निवडणुकीत अर्ज भरतेवेळी योग्य सुव्यवस्था पाळण्यासाठी तैनात पोलिसांवर ‘आप’चे वेन्झी चवताळले हे एक वेळ समजू शकते. मात्र भाजपचे नगरसेवक दीपक नाईक पोलिसांना धमक्या देतात म्हटल्यावर पोलिसांनी काय करायचे? राजकारण्यांनी व कार्यकर्त्यांनी जमावाच्या बळावर कायदा तोडणे हे गैर व चुकीचेच आहे, हे या लोकांना कोण सांगणार?

दिगंबरांचा पत्रकारांना सल्ला

मडगावच्या नगरपालिकेबद्दल दर दिवशी पत्रकार काही ना काही दोष शोधून काढून टीका करतात. नगरपालिका सगळेच काम वाईट करीत नाही. जास्तीत जास्त कामे चांगली व लोकाभिमुख असतात. मात्र, त्याची दखल पत्रकार घेत नाहीत. जुन्या मार्केटमधील सौंदर्यीकरणाचे काम अत्यंत आवश्यक होते. निदान या कामाची तरी पत्रकारांनी योग्य दखल घेऊन उद्या सकारात्मक बातमी द्यावी, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी सोमवारी दिला. पत्रकार नगरपालिकेच्या चांगल्या कामाचीही प्रसिद्धी देत असतात, हे सांगणे कामत सोयीस्कररित्या कसे काय टाळतात बुवा?

कोण करतो दिशाभूल?

भाजपच्या नावावर दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, अशी मुख्यमंत्र्यांची तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघाबाबत दिशाभूल केली जात आहे. हे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे म्हणणे आहे. त्यांनी भाजपने दिलेला उमेदवार जिंकू शकत नाही, म्हणून दुसरा उमेदवार उभा करून त्याचा प्रचार सुरू केला आहे. बाबू यांनी त्यामुळे बंडखोरी केल्याची चर्चा आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बाबू यांनी आपण बंडखोरी केली नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे, त्यांचा हा रोख आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे असल्याची चर्चा पेडण्यात आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Drug Case: 'एलएसडी' प्रकरणातील फरार संशयिताला बंगळुरूत अटक, चार दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

भिका केरकरवर कुर्टीत दबाव...!

कुर्टी जिल्हा पंचायतीचे अपक्ष उमेदवार भिका केरकर यांना फोंड्यातील एका नगरसेवकाकडून दबाव येत आहे. भिका यांनीच यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली. उमेदवारी दाखल करू नये यासाठी आपल्याला या नगरसेवकाकडून सातत्याने फोन केला जात आहे, पण आपण अशा दबावाला अजिबात भीक घातली नाही, असे सांगून आपण दिलेल्या शब्दानुसार उमेदवारी दाखल केली आहे. आता भिका केरकर हे रायझिंग फोंड्याचे नेते केतन भाटीकर यांचे उमेदवार आहेत, आणि केतन बाब तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या जोमाने भिकाबाबसाठी काम करीत आहेत. त्यामुळेच तर भिकाबाबनी दबाव झुगारला, अशी चर्चा होत आहे.

रितेशची धडाडी...!

फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री रवी नाईक यांचे निधन झाल्यानंतर काहीसे हिरमुसलेले त्यांचे पुत्र रितेश नाईक यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतील प्रचारात सातत्य ठेवले आहे. गेले सहा दिवस सातत्याने रितेश नाईक यांनी उमेदवारासहीत हा मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे. एनकेनप्रकारेण हा मतदारसंघ जिंकून आणायचाच, हा चंगच रितेश नाईकनी बांधला आहे, आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांना सहाय्यही करीत आहेत. या निवडणुकीत रवी पात्रावची उणीव भासत असली तरी ती रितेशबाब भरून काढत आहेत, अशीच चर्चा सध्या सुरू आहे.

नगरसेवक दीपकची धमकी !

काही लोकांना पुढे टीव्ही कॅमेरा दिसला की, चेव येतो. बरोबर जनसमुदाय असला की, प्रत्येकजण स्वतःला टायगर समजायला लागतो. वास्को पालिकेचे नगरसेवक दीपक नाईक यांनी काल दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा अर्ज भरायला आला असता एका ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच म्हणे धमकी दिली. अर्ज भरताना ठराविक लोकांनाच आत सोडण्याचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला आहे. मात्र पोलिसांना या आदेशाचे पालन करताना नाहक ऐकून घ्यावे लागत आहे. भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या नगरसेवक दीपक नाईक याला आत जाण्यास मजाव केल्यामुळे दीपक नाईक नाहक पोलिसांवर ओरडू लागले. ‘आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत’ असे म्हणून दीपक नाईक फुशारक्या मारू लागले. दीपक बाब बांगड्या घातलेल्या स्त्रिया या भित्र्या असतात, असे आपल्याला म्हणायचे आहे का? आपले सरकार आहे म्हणून ड्युटी करणाऱ्या पोलिसांवर ओरडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?

बाजारपेठांचेही आॅडिट करा ना!

हडफडे येथील नाईट क्लबमधील परवाच्या अग्नीतांडवा नंतर आता सरकारने राज्यांतील सर्व नाईट क्लबांचे सुरक्षा अॅाडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजेच पंचवीस जणांचा बळी गेल्यावर हे शहाणपण सूचले आहे अशी टिप्पणी लोकांकडून होत आहे. अनेकजण तर विविध शहरांतील बाजारपेठांची तुलना नाईट क्लबशी करत आहेत. कारण तेथे होत असलेली अतिक्रमणे, विक्रेत्यांकडून उन्हापासून संरक्षणासाठी प्लास्टिकचा होत असलेला वापर पायवाटा व प्रवेशव्दारांवरील अतिक्रमणे व बाजारांत उसळणारी गर्दी पहातां सणासुदीच्या दिवसांत एखादी अनुचित घटना घडली तर काय होईल याची शक्यता लक्षात घेऊन सरकार त्यापूर्वीच विविध शहरांतील खास करून मडगाव सारख्या बाजारातील एकंदर व्यवस्थेचे सुरक्षा आॅडिट का करत नाही, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. कारण यापूर्वीच्या घटनांत जरी जीवितहानी झालेली नसली तरी हडफडेतील प्रकार सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे खरा.

संकल्प यांचा ‘तो’ व्हिडिओ

हडफडे येथील क्लबच्या बांधकामाबाबत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी विधानसभेत विषय उपस्थित केला होता. त्यावेळी त्याची मोठी चर्चा त्याबाबत झाली नव्हती. याची आता यानिमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे. हडफडेतील त्या बांधकामाबाबत सरकारला काहीच माहिती नाही, अशी भूमिका आता सरकार कशी घेऊ शकते, अशी विचारणा होऊ लागली आहे. असे प्रकार डोळे उघडणारे असतात असे सरकार आता म्हणत असले तरी तेव्हा डोळे मिटले नसते, तर असा प्रकार घडलाच नसता, असा टोमणाही यानिमित्ताने ऐकण्यास मिळत आहे.

रिवणात भाजपची आयात उमेदवार?

सांगे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्‍ला मानला जातो. तरीही या मतदारसंघात समाविष्‍ट होणार्‍या रिवण जिल्‍हा पंचायत मतदारसंघात भाजपने राजश्री राजेश गावकर हिला उमेदवारी दिली आहे. त्‍यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण म्‍हणजे, राजश्री गावकर ह्या मळकर्णे पंचायत क्षेत्रात राहात असून हे पंचायत क्षेत्र रिवण जिल्‍हा पंचायत मतदार संघ क्षेत्रात येत नाही. त्‍यामुळे रिवण मतदारसंघात भाजपने बाहेरुन आयात करुन उमेदवार आणले, असा आरोप होऊ लागला आहे. यापूर्वी मतदारसंघातील बाहेरील म्‍हणून भाजपच्‍याच मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍याच उमेदवाराला नाकारला होते. त्‍यामुळे रिवणात काय होणार हा सवाल जाे तो विचारु लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com