
पणजी: गोवा राज्याला उद्योजकतेचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेनं मोठा पाऊल उचलत, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विविध शासकीय योजनांद्वारे स्थानिक उद्योजकांना मदतीचा हात देण्याची घोषणा केली आहे. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (EDII) गोवा सेंटरच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय.
मुख्यमंत्री रोजगार योजना (CMRY) ही गोव्याच्या उद्योजकांसाठी एक मोठी संधी ठरली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ८,००० हून अधिक लाभार्थ्यांना ३०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधील १३,००० पेक्षा जास्त व्यवसायांना ४,१०० कोटी रुपयांचे कर्ज दिलं गेल्याची माहिती त्यांनी दिली. या आर्थिक मदतीमुळं स्थानिक उद्योगांना चालना मिळाली असून, नव्या संधी निर्माण होऊन रोजगाराचं प्रमाणही वाढलं आहे.
EDII गोवा सेंटरने राज्यातील उद्योजकतेला नवी दिशा दिली आहे. मागील वर्षभरात, सेंटरकडून १,५०० हून अधिक उद्योजकांना व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण दिलं आहे. मार्केटिंग, कायदेशीर बाबी, आर्थिक व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केल्यामुळं नवउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय अधिक भक्कमपणे उभारता येतो.
उद्योजकतेला आणखी बळ देण्यासाठी गोवा सरकारनं RAMP (Raising and Accelerating MSME Performance) हा उपक्रम सुरू केलाय. यामध्ये MSME साठी बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनिंग (BMT) दिलं जात असून, १,६०० स्वयं-सहाय्यता गटांमध्ये (SHG) MSME रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या माध्यमामुळे तळागाळातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळालं असून, एक स्वयंपूर्ण आणि प्रगतीशील उद्योजकता संस्था निर्माण होते.
मुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, कारण त्यांच्या मदतीमुळं गोव्यात EDII सेंटर स्थापन करणं शक्य झालंय. आता या केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांशी समन्वय साधत, स्थानिक उद्योजकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. "आमचं ध्येय गोव्याला उद्योजकांसाठी एक आदर्श ठिकाण बनवणं आहे, जिथं व्यवसाय फक्त टिकणारच नाही, तर मोठ्या प्रमाणात वाढेल," असं सावंत यांनी नमूद केलंय. आगामी काळात, सरकार विद्यमान योजना अधिक मजबूत करण्यासह नव्या संधींचा शोध घेणार आहे. गोवा उद्योजकतेच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी मॉडेल ठरण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.