Goa CM In New Delhi: दिल्लीत बोंब, गल्लीत मौन

Goa CM In New Delhi: ‘स्‍मार्टसिटी’च्‍या नावे राजधानीत झालेल्‍या बट्याबोळाला जबाबदार कोण ते जाहीर करावे.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

Goa CM In New Delhi

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्‍लीत भाजपच्‍या प्रचारादरम्‍यान चांगलेच आक्रमक झाले. दिल्‍लीतील महिला आयोगाच्‍या माजी अध्‍यक्षा स्‍वाती मालिवाल यांना मुख्‍यमंत्र्यांचा निकटवर्तीय विभवकुमार यांनी मारहाण केल्‍याचा आरोप आहे, त्‍यावर केजरीवालांचे मौन का, असा खडा सवाल सावंत यांनी उपस्‍थित करून आपली राजधानीत छाप सोडली.

तत्‍काळ गोव्‍यात ‘आप’च्‍या नेत्‍यांनी भाजपच्‍या दुखऱ्या नसांवर बोट ठेवले. दुर्दैवाची बाब अशी, केजरीवालांवर टीका झाल्‍यानंतर ज्‍या मुद्यांची ‘आप’ला उपरती झाली, ते यापूर्वी प्रश्‍‍न म्‍हणून का भेडसावले नाहीत? मुख्‍यमंत्र्यांनी केलेली टीका झोंबल्‍यावर ‘आप’च्‍या नेत्‍यांना नागरी प्रश्‍‍न आठवत असती तर ती तद्दन स्‍वार्थी भूमिका झाली.

मुख्‍यमंत्र्यांचे देखील त्‍याहून निराळे नाही. ‘आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून’. गोव्‍यात अनेक अक्षम्‍य, आक्षेपाचे मुद्दे असूनही मुख्‍यमंत्र्यांचे त्‍यावर महिनोन्‍महिने मौन आहे. दिल्‍लीत जाऊन केजरीवालांना वास्‍तवभान देणाऱ्या डॉ. सावंत यांना गोव्‍याची शान, कलाकारांचा प्राण असलेल्‍या कला अकादमीचे रुदन दिसत नाही का?

त्‍यांनी या विषयीही भाष्‍य करावे. ‘स्‍मार्टसिटी’च्‍या नावे राजधानीत झालेल्‍या बट्याबोळाला जबाबदार कोण ते जाहीर करावे. सुदिन ढवळीकर म्‍हणतात, त्‍याप्रमाणे ‘बंच केबल’ घालण्‍याच्‍या निर्णयामुळे जर वीज खात्‍याचे १५० कोटींचे नुकसान झाले असेल तर ते दायित्व कुणाचे, याचा उलगडा व्‍हावा. शेवटी पैसा जनतेच्‍या खिशातून गेला आहे.

सत्तर कोटी खर्चून कला अकादमीचे अक्षरश: ‘केशवपन’ केले आहे. नूतनीकरण झाल्‍यानंतर छत कोसळते, कार्यक्रम सुरू असताना अचानक ‘जलाभिषेक’ सुरू होतो, साऊंड सिस्‍टमचे तीन तेरा वाजतात आणि त्‍यावर थातूरमातूर कारणे देऊन वेळ मारून नेली जाते, हे संतापजनक आहे.

बांधकाम खात्‍याने इमारत हस्‍तांतरीत केलेली नाही, या सबबीखाली कला व संस्‍कृती खाते हात झटकते. परंतु सरकारने लक्षात घ्‍यावे, ताबा कुणाकडे आहे, याचे कलाकार, नागरिकांना देणेघेणे नाही.

कोट्यवधींची उधळपट्टी करूनही कला अकादमीचा जीव गुदमरत असेल तर दोषी कोण ते जाहीर करा. ही वास्‍तू म्हणजे चरण्याचे कुरण झाले आहे. कलेचा सन्मान सोडून इथे सगळ्या गोष्टी होतात, असे खेदाने म्‍हणावे लागतेय. कला अकादमीत कधीकाळी माईक व ध्‍वनियंत्रणेचा वापर न करता शेवटच्‍या रांगेपर्यंत आवाज पोहोचत असे.

Goa CM Pramod Sawant
Dhvani Bhanushali In Goa: इथले अन्न, पाणी, हवा मला आवडते; बेबी गर्ल म्हणते 'आय लव्ह गोवा'

देशातील नावाजलेल्‍या व उत्‍कृष्‍ट ‘इकोस्‍टिक’ ध्‍वनिसंयोजन असलेल्‍या सभागृहांपैकी कला अकादमी एक होती. नूतनीकरणानंतर मुख्‍य सभागृहातील ‘आवाज’ बसला. मंत्र्यांनी तंत्रज्ञांवर खापर फोडले. त्‍यांना प्रशिक्षणाची गरज आहे, असा त्‍यांचा दावा.

अर्थात ही जबाबदारी कुणाची? कार्यक्रम करावयाचा झाल्‍यास ध्‍वनियंत्रणाही स्वतः खर्च करून आणावी लागते, शिवाय भाड्यात सूट नाहीच. सभागृह खुले करता तेव्‍हा आवश्‍‍यक सुविधा सोबत नकोत का? ‘इकोस्‍टिक’ सभागृहाचा ध्‍वनियंत्रणेशी संबंध नाही.

म्‍हापशातील हनुमान थिएटरमध्‍ये कितीही प्रगत साऊंड सिस्‍टम आणून लावली तरी निर्दोष आवाज येणे कठीण. कारण इकोस्‍टिकच्‍या दृष्‍टीने त्‍या सभागृहाची रचनाच चुकीची आहे.

कला अकादमीच्‍या मुख्‍य सभागृहात झालेली बरीच हलवाहलव सदोष आवाजाचे कारण आहे, हे मान्‍य करा. दुसरे असे, छतावर सुकलेली पाने साचल्‍याने पाणीगळती लागली, असा एक खुलासा मध्‍यंतरी करण्‍यात आला.

असे कारण पुढे करणे म्‍हणजे निकृष्‍ट कामाची कबुली दिल्‍यात जमा आहे. मोडकळीस आलेल्‍या खुर्च्यांनी यापूर्वी तेच दर्शविले आहे. ‘आर्ट गॅलरी’ प्रकाश योजनेसाठी थांबली आहे. ‘ब्‍लॅक बॉक्‍स’मध्‍ये तडजोड म्‍हणून नाटके केली जात. ते मुळात नाट्यगृह नव्‍हते. तो साऊंड स्‍टुडिओ होता.

आता ‘ब्‍लॅक बॉक्‍स नाट्यगृह’ म्‍हणून त्‍याची पुनर्रचना करताना त्‍यात प्रकाश योजना व ध्‍वनियंत्रणा या संबंधी विचार करणेही गरजेचे होते; पण ते झालेले नाही. जुनीच रचना कायम आहे. तीन दिवसांपूर्वी थिएटरमध्‍ये लागलेल्‍या गळतीनंतर ‘एसी’ यंत्रणेसाठी केलेल्‍या जागेतून पाणी झिरपते, असा केलेला खुलासा संयमाचा अंत पाहणार आहे.

कला व संस्‍कृती मंत्र्यांनी मौन बाळगले आहे. त्‍यांनी यापूर्वीच बांधकाम खात्‍याकडे बोट दाखवले आहे, जे मुख्‍यमंत्र्यांकडे आहे. कला अकादमीच्‍या दर्जाबाबत संशय घेण्‍यास बरीच जागा आहे. नूतनीकरणाचे काम करणाऱ्याला नाट्यगृह, थिएटर बांधण्‍याचा अनुभव होत का? खर्च कुठे आणि कसा झाला, अशा प्रश्‍‍नांची उत्तरे गुलदस्‍त्‍यात आहेत.

त्‍यासाठी सरकारने श्‍‍वेतपत्रिका जारी करावी. इमारत नूतनीकरणाच्‍या नावाखाली चार्लस कुरैय्‍या यांचा अनेकदा अपमान झालाय. कलेच्‍या वैभवाला उतरती कळा लागली आहे. मन विषण्‍ण करणाऱ्या स्‍थितीमुळे कलाकार वज्रमूठ आवळत आहेत.

अजून पावसाळा बाकी आहे. दिल्‍लीत केजरीवालांना झापणाऱ्या मुख्‍यमंत्र्यांनी कला अकादमीवरही भाष्‍य करावे. केवळ राजकीय सोईच्‍या भूमिका घेऊ नये. जनतेच्‍या पैशांची उधळपट्टी करून होत्‍याचे नव्‍हते करण्‍याची प्रवृत्ती राज्‍यास अधोगतीला नेणारी आहे.

जबाबदारी ढकलणे, इतरांवर आरोप करणे, यात जी कलात्मकता दाखवली जाते, तीच कला व कौशल्य अकादमीचे काम करण्यात मात्र वापरली जात नाही. एका कला अकादमीवर दरवर्षी इतके पैसे खर्च केले जातात की, त्याच पैशांतून पाच वर्षांत दुसरी कला अकादमी उभारणे सहज शक्य होते.

काम होत नाही, पण पैसे मात्र खर्च होतात; ही अजब कलाकारी सरकारला साधली आहे. दिल्लीत जाऊन टीका करताना गल्लीत काय चालले आहे, त्याचे भान ठेवायला नको?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com