वाहन पार्किंगवरून झालेल्या वादात चिंबल येथील टॅक्सीमालक जयेश चोडणकर याला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
दरम्यान, हा खुनाचा प्रकार असल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करून चौकशी करावी अशी मागणी जयेशच्या कुटुंबीयांनी केली असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
बुधवारी रात्री 8 च्या सुमारास चिंबल येथे जयेश चोडणकर (42, रा. चिंबल, मूळ म्हापसा) आपली टॅक्सी पार्क करत होता. मात्र, नेहमी या जागेवर एक खासगी बस उभी करून ठेवली जाते. त्यामुळे जयेश आणि बसमालकाचा वाहन पार्क करण्यावरून वाद झाला.
हे दोघेही एकमेकांना ओळखत असल्याने वाद संपल्यानंतर बसचालक व त्याच्या नातेवाईकाने जयेशला बोलावून माफी मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी जयेशला मारहाण करण्यात आली.
यानंतर जयेश मेरशी सर्कलच्या दिशेने रस्त्यावरुन धावू लागला. यावेळी त्याला वाहनाची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी मारहाण तसेच अज्ञात वाहनाने धडक दिल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मारहाणप्रकरणी कृपेश वळवईकर आणि ‘आयआरबी’चा पोलिस प्रीतेश हडकोणकर यांना ताब्यात घेतले. जयेशला वाहनाची धडक बसली, तेव्हा मेरशी सर्कलवरून तीन वाहने गेली. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने या तिन्ही वाहनांचा शोध सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.