

Cash for Job Scam: गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या नोकरी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी पूजा नाईकने मोठा खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पूजाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली असून, थेट राज्याचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या हाय-प्रोफाइल घोटाळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नावाचा अप्रत्यक्ष उल्लेख अनेकदा झाला होता, ज्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका होत होती. मात्र, पूजा नाईकने तपास यंत्रणांसमोर केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्यात स्पष्ट केले की, "या संपूर्ण प्रकरणाच्या व्यवहारात आणि पैशाच्या देवाणघेवाणीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कोणताही सहभाग नव्हता." मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या या दिलासामुळे सत्ताधारी भाजपला काही प्रमाणात राजकीय आधार मिळाला आहे.
पूजा नाईकच्या वक्तव्याने आता या घोटाळ्याचे केंद्र दुसऱ्या एका बड्या मंत्र्यांकडे सरकले आहे. पूजाने अत्यंत धक्कादायक दावा केला की, "मला मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनीच आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते."
पूजाने पुढे सांगितले, "मंत्री ढवळीकर यांच्या सूचनेनुसारच मी निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर या दोघांना नोकरी लावून देण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून घेतलेली रक्कम दिली." या खुलाशाने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, कारण या घोटाळ्याचे धागेदोरे आता सत्ताधारी आघाडीतील एका मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचले आहेत.
पूजा नाईकच्या या नवीन आणि महत्त्वपूर्ण साक्षीमुळे, तपास यंत्रणांना आता मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी लागणार आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येणाऱ्या काळात गोव्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. गोवा पोलीस (Goa Police) आणि दक्षता विभागाने या प्रकरणाचा जलदगतीने आणि निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.