

चावडी: गुळे-काणकोण येथे मंगळवारी रात्री लोहार कुटुंबातील अंतर्गत वादाने हिंसक वळण घेतल्याने गावात खळबळ उडाली. समीर चव्हाण (वय २२) या तरुणाने दोन्ही हातांत कोयते घेऊन परिसरात धुमाकूळ घातला. कुटुंबीयांवर धावून जाण्याबरोबरच मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या ग्रामस्थांनाही त्याने कोयते उगारून धमकावले.
घटनास्थळी दाखल झालेल्या काणकोण पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने जवळच्या शेतातून जंगलाच्या दिशेने पलायन केले. दरम्यान, संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आल्याने गुळे येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार, गुळे येथे लोहार कुटुंब अनेक वर्षांपासून हंगामी घरवजा दुकान थाटून उदरनिर्वाह करीत आहे. या कुटुंबातील समीर चव्हाण हा अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेला तरुण दोन दिवसांपूर्वी घरी परतला होता.
त्यानंतर विविध कारणांवरून त्याचे कुटुंबीयांशी वाद सुरू झाले. मंगळवारी रात्री सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास या वादाचा उद्रेक झाला. संतापलेल्या समीरने दोन्ही हातांत कोयते घेऊन कुटुंबीयांच्या दिशेने धाव घेतली. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यावरही कोयते उगारल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, पोलिसांना पाहूनही संशयित शांत झाला नाही. उलट दोन्ही हातांतील कोयते उगारून त्याने पोलिसांसह उपस्थित नागरिकांना धमकावले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने जवळच्या शेतातून जंगलाच्या दिशेने पलायन केले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
तीन महिन्यांपूर्वीच पंचायतीचा ठराव!
या घटनेनंतर गुळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. पंच गणेश गावकर आणि पंच अक्षदा वेळीप यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित कुटुंबातील वारंवार होणाऱ्या वादांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित कुटुंबासह समीर चव्हाण याला तातडीने गावातून हटविण्याची मागणी त्यांनी केली. या कुटुंबातील वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.