Talpona River: तळपण नदीच्या मुखाशी पोर्तुगीज राजवटीपासून कार्यरत असलेली जेटी आहे. त्याचप्रमाणे लहान होड्या नांगरून ठेवण्यासाठी तळपण येथे रॅम्प आहे. जेटी व रॅम्पची दुरुस्ती करण्याची मागणी, गेली वीस वर्षे येथील मच्छीमार करीत आहेत.
मनोहर पर्रीकरांपासून अनेकांनी आश्वासन दिले, पण अद्याप नदीचे पात्र गाळमुक्त करण्याबरोबरच जेटीचा विस्तार व दुरुस्ती करण्यात आलेली नाही. मच्छीमारांचा जेटी धोरणाला विरोध आहे.
सरकारचे जेटी धोरण जाहीर झाले. काणकोण तालुक्यात तळपण जेटी व रॅम्प यांचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे. एवढी वर्षे मागणी करूनही तळपण जेटीचा विस्तार झाला नाही.
नदीचे मुखही गाळमुक्त झाले नसताना आताच सरकारला तळपण जेटी व रॅम्पची सुविधा निर्माण करण्याची सुबुद्धी कशी काय झाली? या बाबतीत तळपण व काणकोणमधील मच्छीमार बुचकळ्यात पडले आहेत.
या जेटीचा वापर फक्त भरतीच्या वेळीच करण्यास वाव आहे. कारण मुख गाळाने भरल्याने ओहोटीच्या वेळी होड्या समुद्रात सोडणे कठीण होत आहे.
अडचणीत वाढ
गाळामुळे जेटीकडे बोटी आणणे कठीण बनत आहे. आता जेटी धोरण राबवून जेटी खाजगी मालकांकडे दिल्यास त्याला येथील मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. कारण या प्रकारामुळे अडचणीत वाढ होणार आहे, असे मत्स्य व्यावसायिक रूद्रेश नमशीकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.