

म्हापसा: गोव्यातील पर्यटन हंगाम सुरू असतानाच कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर शॅक मालक आणि पर्यटकांमधील वाद पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पर्यटकांच्या उद्धट आणि बेजबाबदार वर्तणुकीमुळे स्थानिक व्यावसायिक त्रस्त झाले असून, प्रत्येक वेळी शॅक मालकांवरच कारवाई का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही पर्यटकांच्या विरोधात नाही; पण पर्यटनाच्या नावाखाली स्थानिक कामगारांचा अपमान आणि छळ खपवून घेतला जाणार नाही. सरकारने केवळ पर्यटकांची बाजू न पाहता वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी ‘शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटी’चे सरचिटणीस जॉन लोबो यांनी केली.
ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत संबंधित पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी शॅक कर्मचाऱ्यांशी अत्यंत उद्धट व गैरवर्तन केले. पर्यटकांनी केवळ नियमांचे उल्लंघन केले नाही, तर कर्मचाऱ्यांना चिथावणीही दिली. असे असतानाही केवळ एका बाजूचा विचार करून शॅक मालकांचे परवाने निलंबित करणे आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे लोबो म्हणाले.
गैरवर्तन करणाऱ्या पर्यटकांवर दंड आकारण्यासाठी किंवा कायदेशीर कारवाईसाठी कडक नियम असावेत. तसेच मुख्य पर्यटन स्थळांवर पोलिसांची गस्त वाढवावी, जेणेकरून किरकोळ वाद विकोपाला जाण्यापूर्वीच रोखता येतील, अशी मागणी सोसायटीने केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.