
Goa Cabinet Approves Independent Water Supply Department
पणजी: घराघरांत पेयजल पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा खाते स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी (19 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील आरोग्य अभियांत्रिकी विभाग बंद करून हे खाते स्थापन करण्यात येणार असले तरी खात्यातील अन्य विभागांमधील अभियंत्यांना या नव्या खात्यात रुजू होण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली हे नवे खाते असेल. या खात्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते रुजू होऊ शकतील. त्यांना समकक्ष नियुक्ती मिळेल. या नव्या खात्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.
यापुढे मलजल आणि सांडपाणी वाहून नेणे तसेच प्रक्रिया ही दोन्ही कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून घेण्यात आली आहेत. ही कामे गोवा सांडपाणी व सुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात येणार आहेत. २००१ मध्ये हे महामंडळ स्थापन कऱण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोजकीच कामे असतील.
कोणत्याही नोकऱ्या या गुणवत्तेवरच मिळतात. गोव्यासारख्या छोट्या राज्यात नोकरीच्या आमिषाने केलेल्या फसवणुकीत १०० कोटी रुपये बुडतात, हे चिंताजनक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नोकरीसाठी मध्यस्थ नसतो. विदेशात नोकरी देणाऱ्या संस्था आहेत. त्यापैकी कोणत्या संस्था वैध, याची माहिती अनिवासी गोमंतकीयांच्या आयुक्तालयात मिळते. विदेशात जाण्यासाठी काही पैसे व्हिसा व अन्य प्रक्रियांसाठी लागतात. त्याची पावती त्या संस्था देतात. तशा पावत्या न देणाऱ्या संस्थांवर विश्वास ठेवू नये.
होडार पुलाच्या कामासाठी खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. शिवाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात सरकारी खात्यांची बिले अदा करण्यासाठीही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. सीसीआर कामांच्या ३५ लाख रुपये खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात भ्रूणतज्ज्ञ कंत्राटी पद्धतीने नेमण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बालरोग विभागात तीन व्याख्यात्यांची पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी श्याम काणकोणकर यांना सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.