

पणजी: राज्यातील ४१० पैकी १७८ विद्यालयांचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याचे दिसून आले. यात सरकारी ३४, अनुदानित १३७ आणि विनाअनुदानित ७ विद्यालयांचा समावेश आहे. धारबांदोडा तालुक्याने ९८.४७ टक्क्यांसह पहिला, पेडणे तालुक्याने ९८.३५ टक्क्यांसह दुसरा क्रमांक, तर काणकोण तालुक्याने ९७.४९ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला. यावरून ग्रामीण भागातील मुलांनी दहावीच्या परीक्षेत दमदार यश मिळविल्याचे दिसून येते.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. यंदा राज्यभरातून २०,६१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्याचा एकूण निकाल ९४.५१ टक्के लागला. यात ९६.५१ टक्के मुली, तर ९४.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे चेअरमन भगीरथ शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. पर्वरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्ये बोलत होते. याप्रसंगी विद्यादत्त नाईक, भारत चोपडे, रिमा मडगावकर यांची उपस्थिती होती.
शेट्ये म्हणाले, यंदा राज्यभरातून ४१० विद्यालयांमधील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात अनुदानित ३२१, विनाअनुदानित ११ आणि सरकारी ७८ विद्यालयांचा समावेश होता. गतवर्षीपेक्षा (९५.३४ टक्के) यावर्षी १.१६ टक्क्यांनी निकाल कमी लागल्याच्या प्रश्नावर शेट्ये म्हणाले, याला काही वेगळी कारणे असू शकतात. एक-दोन टक्के मागे-पुढे होत असतात. गुणपत्रिकेची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाला ३५० रुपयांप्रमाणे शुल्क द्यावे लागेल.
त्याची शेवटची तारीख २ मे असेल. त्याशिवाय गुणपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास प्रत्येक विषयासाठी ७५० रुपयांप्रमाणे शुल्क आकारले जाईल. त्यासाठी ११ मे ही शेवटची तारीख आहे. अनुपस्थितीत गुणांच्या पडताळणीसाठी १०० रुपये प्रतिविषयासाठी शुल्क आकारले जाणार असून, त्यासाठी २ मे ही शेवटची तारीख असेल. या सर्वांसाठी २८ एप्रिलपासून पोर्टल खुले होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षेचा निकाल आणि गुणांच्या पडताळणीबाबत विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश गोवा मंडळाने सर्व शाळांना दिले आहेत. या निर्देशानुसार प्रत्येक समितीत किमान एका महिला सदस्याचा समावेश असावा. या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यासाठी, जिथे उपलब्ध असेल तिथे एका समुपदेशकाचा समितीत समावेश करण्याचा सल्लाही शाळांना दिला आहे, असे शेट्ये यांनी नमूद केले.
४१७ विद्यार्थ्यांना एटीकेटी
यावर्षी एकूण ४१७ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली. त्यात खुल्या गटातील ३१४, ओबीसी ८, एससी ३ आणि एसटी गटातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन विषय राहिले असले तरी त्यांना ते सोडवता येणार आहेत आणि ते अकरावीला प्रवेशही घेऊ शकतात. त्याशिवाय ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या ‘एच’ किंवा ‘आय’ श्रेणी असलेल्या तसेच एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची ६ जून रोजी पुरवणी परीक्षा घेतली जाईल, असे शेट्ये यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेमध्ये ९४.५१ टक्केवारीसह गोव्याची मान उंचावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! उत्कृष्ट कामगिरीद्वारे पुन्हा गुणवत्तेचा नवा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक. ज्यांना यावेळी यश मिळवता आले नाही, त्यांनी मुळीच आशा सोडू नये. हा तुमच्या प्रवासातील केवळ एक टप्पा आहे. जिद्द कायम ठेवा, अधिक कठोर परिश्रम करा; यश तुम्हाला नक्कीच गवसेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
पाच विद्यार्थ्यांनी दिली घरातून परीक्षा
यावर्षी अपघात तसेच अन्य काही कारणांमुळे ५ विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा द्यावी लागली होती. एका विद्यार्थ्याने पाच पेपर दिले होते. परंतु सहाव्या पेपरला तो अनुपस्थित दिसून आला. त्यामागील कारण शोधल्यावर त्यांच्या कुटुंबाने सर्वांचे गावाला जाण्याचे तिकीट आरक्षित केले होते. त्यामुळे तो अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
शंभर टक्के निकालात २९ शाळांसह फोंडा तालुका आघाडीवर राहिला. त्यानंतर तिसवाडी (२३), सासष्टी (२२) आणि बार्देश (१७) या तालुक्यांचा क्रमांक लागला. डिचोली तालुक्यात १४, तर केपे आणि मुरगाव या तालुक्यांमधील प्रत्येकी ११ शाळांनी शंभर टक्के यशाची नोंद केल्याचे शेट्ये यांनी सांगितले.
दिव्यांग उमेदवारांचीही चमक
या परीक्षेत दिव्यांग उमेदवारांनी अत्यंत प्रभावी कामगिरी नोंदवली असून, ५५० पैकी ५४३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९८.७३ टक्के इतके आहे.
विशेष शाळांच्या यादीतील सर्व संस्थांनी १०० टक्के उत्तीर्णतेचा दर गाठला आहे. पर्वरी येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन आणि ढवळी-फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठानद्वारे चालविल्या जाणाऱ्या दोन स्वतंत्र शाळांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.